Riyan Parag Vaping Video BCCI Reaction: बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करत असल्याच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. रियान पराग पंजाब किंग्सविरूद्ध लाईव्ह सामन्यात ई-सिगारेट ओढत होता. राजस्थान रॉयल्स धावांचा पाठलाग करत असताना ही घटना घडली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ई-सिगारेटवर भारतात बंदी आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय कारवाई करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. यादरम्यान बीसीसीआयने नेमकं या प्रकरणावर काय वक्तव्य केलंय, जाणून घेऊया.
बीसीसीआयने म्हटलं आहे की, ते रियानकडून स्पष्टीकरण मागवतील आणि व्हिडिओच्या आधारे कारवाई करतील. ही घटना मंगळवारी (२९ एप्रिल) मुल्लानपूर येथे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग २०२६ (आयपीएल २०२६) सामन्यादरम्यान घडली. लाईव्ह सामन्यादरम्यान रियान ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली.
रियान पराग व्हेपिंग प्रकरणाबाबत बीसीसीआय काय म्हणाली?
या घटनेने आता बीसीसीआयचं लक्ष वेधलं असून, बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, पुढील कोणतीही कारवाई करण्यापूर्वी परागला प्रतिक्रिया देण्यास सांगितलं जाईल. ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणी रियानकडून स्पष्टीकरण मागू, कारण व्हेपिंग करण्यास परवानगी नाही. त्याच्या प्रतिक्रियेच्या आधारावर आयपीएल पुढील कारवाई करेल.”
राजस्थान रॉयल्स २२३ धावांचा पाठलाग करत असताना पराग बाद झाल्यानंतर लगेचच हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचं मानलं जात आहे. शिक्षेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, अनेक वृत्तांनुसार अंतर्गत चौकशी सुरू आहे. या २४ वर्षीय खेळाडूची आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. नऊ सामन्यांमध्ये त्याने १४.६३ च्या सरासरीने आणि १२४.४७ च्या स्ट्राइक रेटने ११७ धावा केल्या आहेत.
रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्सकडे ट्रेड केल्यानंतर, परागने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवलेल्या पाच खेळाडूंपैकी तो एक होता.
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सशी संबंधित हा दुसरा वाद आहे. या हंगामाच्या सुरुवातीला, गुवाहाटी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान फ्रँचायझीचे मॅनेजर रोमी भिंडर फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटने (ACSU) नंतर त्यांना ताकीद देऊन आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावून या आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं.
