भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवले होते. ३० जुलैपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज बीसीसीआयकडे पाठवायचे होते. विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांच्यासोबतचा करार संपला आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने या सर्वांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. आहे. मात्र नवीन प्रशिक्षकाच्याजागेसाठी तब्बल २ हजार जणांनी अर्ज केल्याचं समजतंय. मात्र बंगळुरु मिरर वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या दोन हजार अर्जांमध्ये काही नावांचा अपवाद वगळचा एकही उमेदवार शास्त्री आणि त्यांच्या टीमला आव्हान देईल असा नाहीये.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मुडी, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. याव्यतिरीक्त माजी दक्षिण आफ्रिकी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक तर प्रविण आमरे यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचं समजतंय. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी श्रीलंकन कर्णधार महेला जयवर्धनेही शर्यतीत होता, मात्र बंगळुरु मिररच्या वृत्तानुसार त्याने आपला अर्ज केलेला नाहीये.

अवश्य वाचा – धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षक, इतर खेळाडू अजुनही शिकतायत – एम. एस. के. प्रसाद

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी बीसीसीआयने माजी खेळाडू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती स्थापन केली आहे. ही समिती भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक निवडणार आहे.