भारतामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मोहिमेदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना कोणतीही सवलत देण्याच्या तयारीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर आपले विजेतेपद कायम राखण्याच्या तयारीत असून, सलग तीन वेळा विश्वचषक जिंकणारा इतिहासातील पहिला संघ होण्याचं लक्ष्य ठेवून आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, जिथे भारताला बॉर्डर-गावस्कर करंडकात ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर गेल्या वर्षी बीसीसीआयने जारी केलेल्या कठोर निर्देशांवर मंडळ ठाम राहिलं आहे.

या निर्णयांपैकी सर्वाधिक चर्चेत आलेला निर्णय म्हणजे दौऱ्यादरम्यान खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यास मनाई करणं. या संदर्भातील सूचनेनुसार, ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर केवळ जास्तीत जास्त १५ दिवसच राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबियांसोबत टीम हॉटेलमध्ये राहू शकणार नाहीत. संघ व्यवस्थापनाने या मुद्द्यावर स्पष्टता मागितल्यानंतर बीसीसीआयने हे निर्देश जारी केले. पण, कुटुंबिय इच्छित असल्यास त्यांची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था करू शकतात.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहण्यास परवानगी देण्याबाबत स्पष्टता मागितली होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “भारतीय संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला विचारले होते की पत्नी आणि पार्टनर संघासोबत प्रवास करू शकतात का आणि त्यांच्यासोबत राहू शकतात का.” बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की “खेळाडूंचं कुटुंबिय त्यांच्यासोबत राहणार नाहीत. पण, जर त्यांना इच्छा असेल तर ते स्वतंत्र व्यवस्था करू शकतात.”

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान भारतीय संघ घरच्या मैदानावर तीन आणि एक लीग सामना कोलंबोमध्ये खेळेल. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या. त्या द्विपक्षीय मालिकांदरम्यानही कुटुंबियांना संघासोबत राहण्याची व प्रवास करण्याची परवानगी नव्हती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ संपूर्ण स्पर्धेत खाजगी चार्टरमध्ये प्रवास करेल. खेळाडूंकडे वैयक्तिक शेफ आहेत, परंतु त्यांनी त्यांची व्यवस्था जवळच्या हॉटेलमध्ये केली आहे, जिथे ते त्यांच्यासाठी स्वयंपाक करू शकतात आणि जेवण पाठवू शकतात.

कुटुंबांनी दौऱ्यावर न जाणं ही काही नवीन घटना नाही. २०२५ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयने अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. अलिकडच्या काळात, विशेषतः कोविड-१९ साथीच्या आजारानंतर, खेळाडूंना संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या कुटुंबियांना सोबत ठेवण्याची परवानगी होती. पण काही खेळाडू अनौपचारिक संघ बैठका आणि नियोजन सत्रांसाठी उपस्थित न राहिल्यामुळे, कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देत असल्याची सपोर्ट स्टाफने माहिती दिली होती. यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता.