इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आय़पीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वाला रविवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी टी २० विश्वचषक सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आलेली आहे. भारतीय संघांमध्ये असणारे खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. यामध्ये अनेक खेळाडू प्रकृतीच्या कारणांमुळे मैदानाबाहेर आहेत. तर काहींवर कामागिरीसंदर्भातील दबाव असल्याचं दिसून आल्याने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयनेच सर्व संघ मालकांना एक चिठ्ठी लिहिलीय. यामध्ये टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघांचा भाग असणाऱ्या खेळाडूंना योग्य वेळी आराम देण्यात यावा, त्यांच्यावरील वर्कलोड कमी करावा असं सांगण्यात आलं आहे.

बीसीसीआयने ही स्पर्धा सुरु होण्याआधीच यासंदर्भातील सुचना संघ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना आणि निर्णय घेणाऱ्यांना केल्या होत्या. त्यामुळेच रविवारी झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघामध्ये नव्हते. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार हा योगा योग नसून आगामी विश्वचषकाचा विचार करुन मुंबईच्या व्यवस्थापनाने या दोघांना आराम देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याच्यासंदर्भात कोणताही धोका स्वीकारण्यास बीसीसीआय तयार नाही. पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने रोहितला आराम देण्याचा योग्य निर्णय घेतल्याचं हा अधिकारी म्हणाला. रोहित नुकताच गुडघ्याला झालेल्या दुखापतीमधून सावरला आहे. आम्ही रोहित आणि मुंबई इंडियन्सला हाच सल्ला दिलाय की आमच्यासाठी टी २० विश्वचषक प्राधान्य क्रमावर आहे. जेवढ्या प्रमाणात शक्य आहे तेवढ्या प्रमाणात या मुख्य खेळाडूंवरील वर्कलोड कमी करावं असं आम्ही संघांना सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सने रोहित आणि हार्दिक पहिल्या सामन्यात न खेळण्यामागे संघ व्यवस्थापनाचा निर्णय असं सांगितलं होतं. मात्र यामागील खरं कारण टी २० विश्वचषकासाठीची तयारी हे असल्याची माहिती समोर येतेय.

मुंबई इंडियन्सच्या संघामधील ६ खेळाडू भारताच्या १५ खेळाडूंच्या चमूमध्ये आहेत. त्यापैकी पाचजण नक्कीच भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये असणार आहेत. यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर यांचा समावेश आहे. रोहित आणि जसप्रीतने इंग्लंडमध्ये चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळेच आता या दोघांच्या सततच्या क्रिकेट खेळण्यामुळे त्यांच्या फिटनेससंदर्भात आता काळजी व्यक्त केली जातेय.