मुंबई : गेल्या काही काळात परदेशात येत असलेले अपयश, तसेच खेळाडूंच्या वाढत्या दुखापती याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज, गुरुवारी मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक बोलावली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि उत्कृष्टता केंद्राचे (सीओई) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आयर्लंड आणि इंग्लंड दौर्यांतील अपयशाचा आढावा, खेळाडूंच्या वारंवार होणार्या दुखापती, तंदुरुस्ती व्यवस्थापन आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी हे बैठकीतील प्रमुख मुद्दे असतील.
‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वी भारतीय संघाच्या परदेशातील कामगिरीचा आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, काही कारणांमुळे प्रस्तावित बैठक लांबणीवर पडली. आता ही बैठक होत असल्याने संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि ‘सीओई’ यांच्यातील समन्वयाबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आगरकर यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येणार असून त्यांना विश्वचषकापर्यंत मुदतवाढ देण्याबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते.
वाढत्या दुखापती
खेळाडूंच्या वाढत्या दुखापती हा भारतीय क्रिकेटसमोरील सध्या सर्वांत मोठा प्रश्न आहे. महत्त्वाच्या दौर्यांपूर्वी प्रमुख खेळाडू जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम संघाच्या संतुलनावर होत आहे. खेळाडू, ‘सीओई’ आणि निवड समिती यांच्यातील संवादातही त्रुटी असल्याचे समोर आले आहे. जसप्रीत बुमरा दौर्यासाठी तंदुरुस्त नसल्याची माहिती निवड समितीला वेळेवर मिळाली नसल्याचे उदाहरण विशेष चर्चेत आले.
तसेच नुकत्याच झालेल्या श्रीलंकेतील कसोटी मालिकेत वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संघाबाहेर पडला, तर साई सुदर्शनला तंदुरुस्ती मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक काळ लागला. आगामी अफगाणिस्तान ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बुमरा, वॉशिंग्टन, नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या चौघांची निवड तंदुरुस्तीवर आधारित असल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना, खेळाडूंच्या तंदुरुस्तीची माहिती निवड समितीपर्यंत वेळेत पोहोचवणे आणि पुनर्वसन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, यावर आढावा बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. तसेच खेळाडूंच्या पुनर्वसनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
‘आयपीएल’ ताणाचाही विचार
दोन महिने चालणार्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सामन्यांचा खेळाडूंच्या शरीरावर होणारा परिणाम हा देखील बैठकीतील महत्त्वाचा विषय असेल. राष्ट्रीय संघातील खेळाडू पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याबाबत संघ व्यवस्थापनाने यापूर्वी ‘बीसीसीआय’कडे चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांवर सततच्या सामन्यांचा आणि प्रवासाचा मोठा ताण येतो. त्यामुळे त्यांना योग्य विश्रांती देणे, सामन्यांचा भार नियंत्रित करणे आणि महत्त्वाच्या मालिकांपूर्वी तंदुरुस्तीची काटेकोर तपासणी करणे आवश्यक ठरणार आहे.
न्यूझीलंड दौरा, विश्वचषक
आगामी न्यूझीलंड दौरा आणि पुढील एकदिवसीय विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून भारतीय संघाची आगामी दिशा निश्चित करण्याची जबाबदारी ‘बीसीसीआय’, संघ व्यवस्थापन व निवड समितीची आहे. कोणत्या खेळाडूंना सातत्याने संधी द्यायची, प्रमुख खेळाडूंचा कामाचा भार कसा नियंत्रित करायचा आणि दुखापतींना आळा घालण्यासाठी काय नियोजन असावे, यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
आयर्लंड, इंग्लंडमध्ये निराशा
ट्वेन्टी-२० विश्वचषक सलग दुसर्यांदा जिंकल्यानंतर काही महिन्यांतच भारतीय संघाला जूनमध्ये तुलनेने दुबळ्या आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची सलग १६ ट्वेन्टी-२० मालिका अपराजित राहण्याची जवळपास तीन वर्षांची मालिका खंडित झाली. त्यानंतरच्या लगेचच झालेल्या इंग्लंड दौर्यात भारतीय संघाला आणखी मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. भारताने पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका ०-४ अशी गमावली. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला,
तर नॉटिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघावर
१२५ धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांच्या उपस्थितीत भारताने इंग्लंडला झुंज दिली. मात्र, भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला.
हार्दिकच्या भूमिकेबाबत चर्चा
* अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या तंदुरुस्तीचा प्रश्नही ‘बीसीसीआय’ आणि संघ व्यवस्थापनासमोर आहे. हार्दिक गेल्या काही काळापासून पाठ आणि पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे.
* पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी हार्दिकला महत्त्वाचा खेळाडू मानले जात असले, तरी सध्या तो एकदिवसीय सामन्यांत पाच ते सहा षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी करू शकत नाही. * हार्दिकची गोलंदाजीची क्षमता हळूहळू कशी वाढवायची, त्याच्यावर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी कशी घ्यायची आणि त्याच्या पुनर्वसनाचे पुढील नियोजन, यावरही बैठकीत विचार होण्याची शक्यता आहे.
