BCCI Review Meeting Updates: श्रीलंकाविरूद्ध कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयने आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, भारताचा वनडे व कसोटी कर्णधार शुबमन गिल, भारताचा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, सेंटर ऑफ एक्सलन्सचे (COE) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश होता. याचबरोबर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया उपस्थित होते. त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, जाणून घेऊया.
खेळाडूंच्या वर्कलोडचं योग्य व्यवस्थापन, मालिकांमधील पुरेसा विश्रांतीचा आणि रिकव्हरीचा वेळ तसेच दुखापतींची शक्यता कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील सायकलपासून अधिक नियोजनबद्ध फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रस्तावित उपायांमध्ये मालिकांदरम्यान खेळाडूंना अधिक विश्रांती मिळेल अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करणं, तसेच विशेषतः SENA देशांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणं आणि मालिकेपूर्वी सराव सामने आयोजित करणं यांचा समावेश आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना BCCIचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “आम्ही आमच्या फ्युचर टूर प्लॅनशी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ते लवकरच विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर बैठकांना उपस्थित राहणार आहेत. भविष्यातील दौऱ्यांचं वेळापत्रक अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की खेळाडूंना योग्य विश्रांती मिळेल. तसेच SENA देशांमध्ये कोणतीही मोठी मालिका सुरू होण्यापूर्वी परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी किंवा सरावासाठी काही सामने खेळण्याची संधी मिळेल.” निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर पूर्वनियोजित कामामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
सततच्या दुखापतींवर चर्चा व तोडगा
भारतीय क्रिकेटच्या आगामी वाटचालीचा रोडमॅप ठरवण्यासाठी बोर्डाच्या मुख्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत सतत वाढत असलेल्या दुखापतींच्या घटनांवरही चर्चा करण्यात आली. कदाचित व्यस्त क्रिकेट वेळापत्रकामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त होत असल्याचं बैठकीत नमूद करण्यात आलं.
सैकिया यांनीही हे मान्य केलं. ते म्हणाले, “खेळाडूंना खूप सामने खेळावे लागत असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर दुखापती होत आहेत. त्यांचं वेळापत्रक पाहिलं, तर इंग्लंड दौऱ्यात १५ सदस्यांच्या वनडे संघातील तीन-चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्याआधी त्यांनी जवळपास दोन महिने IPL खेळलं होतं. या सगळ्याचा खेळाडूंच्या आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो.”
भारतीय संघाचं व्यस्त वेळापत्रक
भारतीय संघाचं वेळापत्रकही सध्या व्यस्त आहे. पुढील IPLच्या मार्चअखेरपर्यंत भारताला ७ कसोटी, १४ वनडे आणि १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंवरील वाढता वर्कलोड लक्षात घेता BCCIने टीम मॅनेजमेंट आणि कर्णधारांना यापुढे वेळापत्रक अधिक चांगल्या पद्धतीने आखून खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचं आश्वासन दिलं आहे.
BCCIचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “सध्याच्या FTPमुळे अशा परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी आम्ही काही मार्ग शोधत आहोत. दुखापतीनंतर एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने पुनरागमन करेल, यासाठी आमच्याकडे आधीपासून एक प्रोटोकॉल आहे. अशा अनावश्यक परिस्थिती टाळण्यासाठी योग्य रणनीती तयार करताना आम्ही कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाकडूनही अभिप्राय घेत आहोत.”
रोहित शर्माच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम
BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी माजी कर्णधार रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रोहित सध्या चांगली कामगिरी करत असून त्याच्या संघातील स्थानाबाबत कोणताही संभ्रम नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सैकिया म्हणाले, “तो प्रत्येक सामन्यात चांगला खेळत आहे. मग आणखी काय हवं? मागील सामन्यात त्याने १३८ धावा केल्या. मग त्याच्याबाबत अशी चर्चा का सुरू आहे? अफवा पसरवणाऱ्यांना आणखी काही बोलण्याचा मुद्दा मला द्यायचा नाही.” यासह दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी रोहित निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये नाही, या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावलं.
अजित आगरकरांच्या भवितव्यावर चर्चा नाही
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सैकिया यांनी स्पष्ट केलं. बैठकीचा विषय केवळ २०२७च्या विश्वचषकासाठीच्या रोडमॅपपुरता मर्यादित होता.
ते म्हणाले, “आज ते (अजित आगरकर) शहराबाहेर होते. ही बैठक अतिशय कमी वेळेच्या नोटिशीवर बोलावण्यात आली होती आणि आमच्या निवड समितीचे प्रमुख शहरात नव्हते. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी ऑनलाइन सहभागी होण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते ज्या ठिकाणी होते, तिथून ते ऑनलाइनही सहभागी होऊ शकले नाहीत.”
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुविधांबाबत चिंता नाही
आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंच्या निवास आणि इतर सुविधांबाबत निर्माण झालेल्या चिंतेवरही सैकिया यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “जपानमध्ये आम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.”
भारतीय क्रिकेटपटूंना क्रूझ जहाजांमधील कंटेनर व्हिलामध्ये राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर सैकिया म्हणाले, “अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आमच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला आयोजकांकडून किंवा BCCIकडून सर्वोत्तम सुविधा मिळतील, याची आम्ही खात्री करू. गरज पडल्यास खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी BCCI स्वतःची व्यवस्था उभी करेल.”
