IPL 2026 Rules: आयपीएलचा १९वा हंगाम अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघ यंदाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. काही संघांना दुखापतींचा जबर फटका बसला आहे. तर काही संघ मात्र पूर्ण संघानिशी आणि रणनिती तयार करत मैदानात उतरतील. यादरम्यान बीसीसीआयने संघांसाठी सीझन सुरू होण्यापूर्वी आणि स्पर्धेच्या दरम्यान कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, याची नियमावली दिली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने आयपीएल २०२६ मध्ये सामन्याच्या दिवशी सराव सत्र घेण्यास संघांना बंदी घातली आहे. संघ व्यवस्थापकांना पाठवलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सरावासाठी संघांना प्रॅक्टिस क्षेत्रात दोन नेट्स आणि मुख्य मैदानावर ‘रेंज-हिटिंग’साठी एका बाजूची खेळपट्टी दिली जाईल. वानखेडे स्टेडियममध्ये जर दोन्ही संघ एकाच वेळी सराव करत असतील, तर प्रत्येक संघाला दोन खेळपट्टी दिल्या जातील.
IPL २०२६साठी काही महत्त्वाचे नियम
- सरावासाठी ओपन नेट्सला परवानगी नसेल.
- एका संघाने लवकर सराव संपवला, तरी दुसऱ्या संघाला ती खेळपट्टी वापरता येणार नाही.
- सामन्याच्या दिवशी मुख्य मैदानावर फिटनेस चाचण्यांना परवानगी नसेल.
- सरावाच्या दिवशी खेळाडूंनी संघाच्या बसनेच स्टेडियमवर यावे, मात्र संघ दोन गटांत विभागला जाऊ शकतो.
- खेळाडूंनी कुटुंबीयांपासून वेगळा प्रवास करावा; कुटुंबीय आणि मित्र स्वतंत्र वाहनांतून येऊ शकतात आणि त्यांना हॉटेल/हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून सामना पाहता येईल.
सामन्याच्या दिवशी लागू असलेले नियम
- खेळाडूंना हिटिंग नेट्सची सुविधा असली तरी चेंडू LED बोर्डवर मारू नयेत, असं सांगण्यात आलं आहे.
- खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला LED बोर्डसमोर बसण्यास मनाई आहे. टॉवेल आणि पाण्याच्या बाटल्यांसह मैदानावर जाणाऱ्या बदली खेळाडूंसाठी स्वतंत्र बसण्याची जागा निश्चित केली जाईल.
- खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅप परिधान करणं आवश्यक आहे; तसं शक्य नसल्यास किमान पहिल्या दोन षटकांपर्यंत त्या घालाव्यात, जेणेकरून प्रसारणात ते दिसतील.
- सामन्यानंतरच्या सादरीकरणावेळी स्लीव्हलेस जर्सी आणि चप्पल घालण्यास बंदी आहे. पहिल्या वेळी नियमभंग केल्यास इशारा दिला जाईल, तर दुसऱ्यांदा आर्थिक दंड आकारला जाईल.
आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. निवडणुकांमुळे बीसीसीआयने स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अद्याप निश्चित केलेलं नाही. सुरूवातीला फक्त पहिल्या भागाचं म्हणजेच २० दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
