Devjit Saikia On Womens Asia Cup Trophy Controversy: महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर विजयाची नोंद केली. पण पुन्हा एकदा ACC प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला हरवून आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने देखील मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. दरम्यान यावेळी भारतीय संघाने ही ट्रॉफी का नाकारली? यावर बीसीसीआयने काय स्पष्टीकरण दिलं? जाणून घ्या.

बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “यामागे दुसरं काहीच कारण नाही. मी काहीच वेगळं बोलणार नाही. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाममध्ये जे काही घडलं, त्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी खराब झाले आहेत. आम्हाला पाकिस्तानसोबत कुठलाही सामना खेळायचा नव्हता. पण बीसीसीआयने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचं पालन केलं आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

तसेच ते पुढे म्हणाले की, “ACC ची देखील एक जुनी पॉलिसी आहे. ती म्हणजे जो संघ आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफी जिंकणार, त्या देशाचा सचिव किंवा अध्यक्ष ट्रॉफी द्यायला जाणार. हा एक अलिखित नियम होता. बांगलादेश किंवा श्रीलंकेचा संघ जिंकला होता, त्यावेळी जय शाह यांनी ट्रॉफी दिली नव्हती. पण गेल्यावेळी भारताने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली, त्यावेळी या नियमाचं पालन केलं गेलं नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी पुढे गेले. पण यावेळी काही कारणं आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकार करणार नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक भारतीय खेळाडू आणि देशवासीयांसाठी आधी देश खूप महत्वाचा आहे. संपूर्ण देशवासीयांना हेच वाटतं की, जो व्यक्ती आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा करतो, त्याच्या हातून ट्रॉफी कशी घेणार? त्यामुळेच पुरुष संघ जिंकला तेव्हा आणि महिला संघ जिंकल्यानंतरही भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला आहे.”