इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा नुकताच यशस्वी समारोप झाला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेतील सामने देशातील सहा क्रिकेट मैदानांवर खेळवण्यात आले होते. या सहा ठिकाणांवरील ग्राऊंडस्टाफने आयपीएल २०२२ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या या कामगिरीवर खुश आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खुश होऊन बीसीसीआयने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने या आयपीएल हंगामात सामने आयोजित केलेल्या सहा ठिकाणींचे क्युरेटर आणि ग्राऊंडमन्ससाठी 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सोमवारी एका ट्विटमध्ये मैदानावरील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे यावर्षी महाराष्ट्रातील चार ठिकाणी साखळी सामने आयोजित करण्यात आले होता. त्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमचा समावेश होता. या चार ठिकाणी एकूण ७० सामने खेळवण्यात आले होते. तर कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफचे सामने झाले. या सहाही ठिकाणच्या सर्व सामन्यांचे प्रत्यक्ष नियोजन करण्यात तेथील ग्राऊंड स्टाफने बीसीसीआयला मोलाची साथ दिली. म्हणून त्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जय शाह यांनी सोमवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “ज्यांनी आम्हाला आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्तम खेळ दिले त्यांच्यासाठी 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. आयपीएलच्या या सीझनमधील सहा ठिकाणांवरील क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन आमचे हिरो ठरले आहेत.”

शाह यांनी आणखी एक ट्विट करत म्हणाले की, ‘या हंगामामध्ये आम्ही काही हाय ऑक्टेन गेम्स पाहिले आहेत. त्यावेळी मैदानावरील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. सीसीआय, वानखेडे, डीवाय पाटील आणि एमसीए, पुणे येथील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि इडन गार्डन व नरेंद्र मोदी स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांसाठी १२.५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.’

बीसीसीआयने मैदानावरील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे बक्षिसाची घोषणा केल्याने, कर्मचारी आनंदी झाले आहेत. शिवाय, सोशल मीडियावरही बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.