युवा संघात निवडीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे सदस्य खेळाडुंच्या पालकांना ‘सेक्सुअल फेवर्स’ची मागणी करत असल्याचा आरोप लोढा समितीचे सचिव गोपाल शंकर नारायण यांनी केली आहे. नऊ ऑगस्ट रोजी बीसीसीआयच्या बैठकीत त्यांनी हा आरोप केला होता. या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर उपस्थित नव्हते. सचिव अजय शिर्के यांनी यासंबंधी १४ पानांचा अहवाल ठाकूर यांना इ-मेल केला असून तो मेल इंडियन एक्सप्रेसच्या हाती लागला आहे. भ्रष्टाचाराकडे बीसीसीआय दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी बैठकीत केला होता.
संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे अनुराग ठाकूर हे बैठकीस उपस्थित नव्हते. बैठक संपत असतानाच शंकर नारायणन यांनी न्यायमूर्ती लोढा यांना काही सांगायचे आहे, असे म्हणत युवा निवड समितीच्या प्रकरणाची माहिती दिली. युवा खेळाडुंची निवड करताना समिती सदस्य हे त्यांच्या पालकांना सेक्सुअल फेवर्सची मागणी करतात, असा आरोप केला. हा सर्व वृत्तांत शिर्के यांनी आपल्या अहवालात मांडला आहे.
हा अत्यंत हीन दर्जाचा आरोप असल्याचा दावा शिर्के यांनी केला आहे. या बैठकीला अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे बैठकीत जे काही झाले, त्याचा विस्तृत अहवाल पाठवण्याची माझी जबाबदारी असल्यामुळे मी ती पाठवली, असे  त्यांनी म्हटले. शंकर नारायणन यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.