बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला आशा आहे, की भारतात होणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय मालिकेत चाहते स्टेडियममध्ये येऊ शकतील. गांगुलीचे हे विधान राज्य सरकारच्या विविध राज्य संघटनांच्या मान्यतेनंतर आले आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये फक्त ७० टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. या मालिकेत तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत खेळवली जाईल. मात्र, भारतात न्यूझीलंडची कामगिरी चांगली झालेली नाही.

स्पोर्टस्टारशी संवाद साधताना सौरव गांगुली म्हणाला, ”संपूर्ण स्टेडियम भरेल, अशी अपेक्षा आहे. करोनामुळे आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा देशात पार पडला. मात्र चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नाही. स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईला हलवण्यात आला. याशिवाय बीसीसीआयने टी-२० विश्वचषक भारताऐवजी यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णयही घेतला.

हेही वाचा – T20 World Cup : विराटच्या संघ सहकाऱ्याची हॅटट्रीक; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला पराक्रम, पण…

पश्चिम बंगाल सरकारकडून ७० टक्के, तर झारखंड सरकारकडून ५० टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जयपूरशिवाय रांची आणि कोलकाता येथे टी-२० सामने होणार आहेत. यानंतर कानपूर आणि मुंबईत २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेऊ इच्छित आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान, बोर्डाने मर्यादित संख्येने चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी दिली होती. पण करोना प्रकरणे वाढल्यानंतर मर्यादित षटकांची मालिका चाहत्यांशिवाय झाली. मग आयपीएलमध्येही चाहते येऊ शकले नाहीत. पण बीसीसीआय सामन्यादरम्यान चाहत्यांसाठी प्रोटोकॉल बनवू शकते. यामध्ये फक्त दोन्ही लसीकरण करणार्‍या चाहत्यांनाच परवानगी मिळणे अपेक्षित आहे.