रोहित शर्मा व विराट कोहली यांनी टी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. याचबरोबर गौतम गंभीर व अजित आगरकर कोच तसेच निवड समितीचे प्रमुख या भूमिकेत आहेत. गंभीर व आगरकर जोडी भारतीय संघाचं मैदानाबाहेरून नेतृत्त्व करत असताना भारतीय क्रिकेटला लाजिरवाण्या पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. पण यादरम्यान रोहित-विराटचे गंभीर व आगरकर यांच्याशी मतभेद असल्याचे काही रिपोर्ट समोर आले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात व दिग्गज खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेटमधील दोन महत्त्वाच्या निर्णयकर्त्यांबरोबर काही ज्येष्ठ खेळाडूंमध्येही मतभेद उघडपणे समोर येत आहेत.

‘दैनिक जागरण’च्या अहवालानुसार, सध्या वनडे संघातील वातावरण चांगलं नाही आणि याबाबत BCCIला तातडीची बैठक बोलवावी लागू शकते. मात्र, या अहवालात असंही नमूद केले आहे की कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर रिव्ह्यू बैठक घेण्यात आली नव्हती. कसोटीमध्ये भारताने शेवटच्या सात घरच्या कसोटी सामन्यांपैकी पाच सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर अशी बैठक होण्याची शक्यता असल्याचं समोर येत आहे.

याच अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गंभीर आणि कोहली यांच्यात अजिबात संवाद झालेला नाही. दुसरीकडे, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच कर्णधारपदावरून हटवण्यात आले, तेव्हापासून रोहित आणि आगरकर यांच्यातही कोणताच संवाद झालेला नाही. इतकंच नव्हे, कसोटी कर्णधार शुबमन गिलला वनडे संघाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाल्याची चर्चा आहे.

गौतम गंभीरच्या ट्रोलिंगबाबत बीसीसीआय नाराज

सोशल मीडियावरील घडामोडींमुळे BCCI नाराज आहे. अलीकडच्या काळात चाहत्यांकडून कोच गंभीरवर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असून, या सर्व प्रकाराने बोर्डाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षकांवर जोरदार टीका होत आहे.

दोन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर कसोटी संघाला क्लीन स्वीपला सामोरं जावं लागल्याने ही नाराजी आणखी वाढली. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांपुरतेच नव्हे, तर स्टेडियममध्येही गौतम गंभीरविरूद्ध चाहत्यांनी स्पष्टपणे असंतोष दाखवला. गुवाहाटीत दुसऱ्या कसोटीनंतर संघाचा पराभव झाल्यानंतर स्टेडियममधये गंभीरविरूद्ध घोषणाबाजी होत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

रोहित शर्मा व विराट कोहलीचा २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापन विचार करत नसल्याची माहिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी समोर आली होती. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही वनडे मालिकांमध्ये रोहित व विराटने इतर खेळाडूंच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.