मुंबई : आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात दुलीप करंडक आणि इराणी चषक या प्रतिष्ठेच्या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्नशील आहे. तसेच रणजी करंडक स्पर्धाही पूर्ण स्वरूपात होण्याची दाट शक्यता आहे.

दुलीप करंडक आणि इराणी चषक या स्पर्धाना भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, गेल्या तीन हंगामांमध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या नव्हत्या. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर, २०२०मध्ये रणजी करंडक स्पर्धा रद्द करणे ‘बीसीसीआय’ला भाग पडले होते. गेल्या हंगामात रणजी स्पर्धा मर्यादित स्वरूपात झाली होती. जैव-सुरक्षा वातावरणात झालेल्या या स्पर्धेत सामन्यांची संख्या कमी करण्यात आली होती.

गुरुवारी मुंबईत झालेल्या ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाली. अखेरीस २०२२-२३च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात नियमितपणे स्पर्धा होणार असल्याचे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.

’ दुलीप करंडक स्पर्धा ही पूर्वी पाच विभागांमध्ये (उदा. पश्चिम, दक्षिण) बाद फेरीच्या स्वरूपात खेळवण्यात येत होती. मात्र, पुढे त्यात बदल करून ही स्पर्धा तीन संघांमध्ये खेळवली जाऊ लागली. प्रत्येक संघ एकमेकांशी खेळल्यानंतर अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरायचे. आगामी हंगामात ही स्पर्धा ८ सप्टेंबरपासून घेण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार आहे.

’ इराणी चषकासाठीचा सामना १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या सामन्यात रणजी विजेत्या संघाला शेष भारत संघाशी दोन हात करावे लागतात.

’ मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेला ११ ऑक्टोबर, विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला १२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे.

’ रणजी करंडक स्पर्धेला १३ डिसेंबरपासून प्रारंभ होण्याची शक्यता असून बाद फेरीचे सामने १ फेब्रुवारीपासून खेळवले जाऊ शकतील.