India vs Bangladesh Tour BCCI Government Clearance Update: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तर यापूर्वी संघ युके दौऱ्यावर होता. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण यादरम्यान भारतीय संघाचा एक दौरा मात्र रद्द झाला आहे. सातत्याने या दौऱ्याबाबत दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरू आहे. आता भारतीय संघ या देशाच्या दौऱ्यावर भारतीय संघ जाणार की नाही याबाबत भारतीय सरकारशी चर्चा करणार आहे.
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा बरेचदा रद्द झाला आहे. भारतीय संघाच्या प्रस्तावित बांगलादेश दौऱ्याबाबत बीसीसीआय आता भारत सरकारकडे परवानगी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील तणावपूर्ण घडामोडींमुळे दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधांवर त्याचा परिणाम झाल्याचं मानलं जात आहे. इंडिया टुडेशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं की, सध्याच्या परिस्थितीत बोर्ड स्वतःहून या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकत नाही आणि सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती देताना सांगितलं, “आम्ही या विषयावर काम करत आहोत आणि बांगलादेश दौऱ्याबाबत परवानगी तसेच स्पष्टता मागणार आहोत. सध्या आम्ही स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र लवकरच आम्ही सरकारशी संपर्क साधू.”
याचबरोबर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) बीसीसीआयला पत्र लिहिल्याचीही पुष्टी या सूत्राने केली. या मालिकेबाबत दोन्ही बोर्डांमध्ये सातत्याने संवाद सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सूत्राने पुढे सांगितलं, “बीसीबीने आम्हाला पत्र लिहिलं आहे आणि ते आमच्याशी सतत संपर्कात आहेत. लवकरच अधिक स्पष्टता मिळेल.”
भारतातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा कालावधी राखून ठेवला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय सामने १, ३ आणि ६ सप्टेंबर रोजी, तर टी-२० सामने ९, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार आहेत. भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र हा दौरा अद्याप भारत सरकारच्या मार्गदर्शन आणि मंजुरीवर अवलंबून आहे.
या अनिश्चिततेची पार्श्वभूमी म्हणजे यावर्षीच्या सुरुवातीला भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये आलेली तणावपूर्ण स्थिती. जानेवारी महिन्यातील एका निर्णयाने या तणावाला अधिक हवा मिळाली. बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२६ संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्याचे निर्देश दिले होते.
