Sandeep Patil On Sachin Tendulkar: भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. जे मोडून काढणं कठीण नाही, तर जवळजवळ अशक्य आहे. २४ वर्ष भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेनंतर सचिन फलंदाजीत हवी तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता. तरीदेखील कोणीच सचिनला संघाबाहेर करण्याचा विचार केला नव्हता. आता दशक भरानंतर बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी सचिनबाबत मोठा खुलासा केला आहे.

विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना संदीप पाटील यांनी सांगितलं की, जेव्हा सचिनला समजलं की निवड समिती त्याच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहे. त्यावेळी सचिनला आश्चर्याचा धक्का बसला होता. निवड समितीने सचिनला त्याच्या भविष्याच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं होतं. त्यावेळी सचिनने क? असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर सचिनने मला कॉल केला आणि विचारलं की, तुम्ही सिरियस आहात का? यावर मी सचिनला हो, असं सांगितलं होतं.

सचिन २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यानंतर तो भावूक झाला होता. संदीप पाटील म्हणाले, “निवड समितीकडे कुठल्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडण्याचा अधिकार नाही. निवडकर्ते कुठल्याच खेळाडूला असं म्हणू शकत नाही की, तुझी कारकिर्द संपली आहे. आम्ही सचिनला त्याच्या भविष्यातील प्लॅन विचारला होता. यावर तो म्हणाला होता की, त्याला आणखी खेळायचं आहे. आम्ही त्याला हो असं म्हटलं होतं. माझा कार्यकाळ हा सचिनच्या निवृत्तीसाठी चर्चेत राहिला.”

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यात सचिनने मोलाची भूमिका बजावली होती. पण त्यानंतर सचिन धावा करण्यात अपयशी ठरला होता. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावण्याच्या उंबरठ्यावर होता. पण १ शतक झळकावण्यासाठी त्याला बरेच सामने वाट पाहावी लागली होती. २०१२ मध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ९ कसोटी सामन्यांमध्ये त्याने अवघ्या २३.८० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तर १० वनडे सामन्यांमध्ये त्याने ३१.५० च्या सरासरीने धावा केल्या होत्या.