India Women Cricket Team Refuses Asia Cup Trophy: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास पुरुष संघाने नकार दिल्याच्या वर्षभरानंतर आता महिला क्रिकेट संघानेही त्याचे अनुकरण केले आहे. रविवारी दुबईच्या मैदानावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव केला. आठव्यांदा महिला आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर बीसीसीआयने नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सामना संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मुझुमदार म्हणाले, “मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक न स्वीकारण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत. आमच्यासाठी स्पर्धा संपली असून आम्ही विजेते आहोत, एवढेच आमच्यासाठी पुरेसे आहे. जेतेपद मिळवल्याचा आम्हाला आनंद आहे.”
२८ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघानेही आशिया चषक जिंकला होता. तेव्हा मोहसीन नक्वी पुरस्कार वितरण समारंभाला आल्यानंतर भारतीय संघाने त्यांच्या हस्ते चषक आणि इतर पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी हे चक्क चषक घेऊन जाताना दिसले होते. वर्षभरानंतर बीसीसीआयने त्याची पुनरावृत्ती केली.
संघाची भूमिका मांडताना प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले, “भारतीय संघाने श्रीलंकेवर ७२ धावांनी विजय मिळवला असून हे यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे चषक न स्वीकारण्याच्या निर्णयाचा संघाला कोणताही पश्चाताप नाही. आता आम्ही पुढील आशियाई खेळांकडे लक्ष देत आहोत.”
सामना सुरू असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी हे मैदानात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव देवजित सैकिया यांच्या शेजारी बसलेले दिसले. सामना संपल्यानंतर मैदानात एकाबाजूला भारतीय संघाचे खेळाडू प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्याभोवती जमले होते. राजीव शुक्ला आणि देवजित सैकिया यांनीही टीम इंडियाच्या जल्लोषात सहभाग घेतला. तर नक्वी मैदानावर इतरांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले.
Mohsin Naqvi was standing on the podium to present the trophy. When Smriti Mandhana came out and saw him standing there, she went back into the dressing room.???? pic.twitter.com/al1fQ6wXu5
— ???????⁴⁵ (@rushiii_12) September 13, 2026
सामन्यानंतर अधिकृतपणे बक्षीस वितरण समारंभ सुरू झाल्यानंतर नक्वी यांनी उपविजेतेपदाचा धनादेश श्रीलंकेच्या कर्णधार चमारी अटापट्टूला प्रदान केला. यानंतर अटापट्टूने प्रेझेंटर आणि श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू फरवेझ महरूफ यांच्याशी संवाद साधल्यानंतर सोहळा संपला. त्यानंतर नक्वी आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रतिनिधींबरोबर मैदानाबाहेर पडले.
