सनरायझर्स हैदराबाद संघ अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे, परंतु त्यांनी फक्त एकदाच विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या काही वर्षांत संघाने उत्तम कामगिरी केली असली तरी त्यांना जेतेपद पटकावता आलेलं नाही. या फ्रँचायझीने द हंड्रेडमध्ये सनरायझर्स लीड्स नावाचा संघ विकत खरेदी केली. दरम्यान, जेव्हा पुढच्या हंगामासाठी लिलाव झाला तेव्हा संघाने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचा आपल्या संघात समावेश केला, त्यावरून गोंधळ उडाला आहे. याबाबत आता बीसीसीआयने वक्तव्य केलं आहे.
सनरायझर्स लीड्स संघाने द हंड्रेड स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूला ताफ्यात सामील केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सनरायझर्स फ्रँचायझीची मालकिण काव्या मारनला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. सनरायझर्स संघाला आयपीएलमध्ये बंदी घाला, अशी मागणीदेखील चाहते करत आहेत. यादरम्यान बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
आयपीएलचा पुढचा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होत आहे. पण त्याच दरम्यान, इंग्लिश लीग द हंड्रेड, अचानक चर्चेचा विषय ठरली. सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेतले आहे. अबरारची किंमत पाऊंडमध्ये दाखवली असली तरी, भारतीय रुपयांमध्ये, सनरायझर्सने त्याच्यासाठी २ कोटींपेक्षा अधिक किंमत मोजली आहे, यामुळे वाद शिगेला पोहोचला आहे.
शुक्रवारी जेव्हा बीसीसीआयचे सचिव राजीव शुक्ला यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, “आमचं कार्यक्षेत्र केवळ आयपीएलपुरतंच मर्यादित आहे. आयपीएलच्या बाहेर इतर कोणत्या लीगमध्ये काय घडतं, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. परदेशातील एखाद्या लीगमध्ये एखाद्या खेळाडूला साइन करण्याबाबत आम्ही कसा हस्तक्षेप करू शकतो? भारताबाहेर संघ विकत घेतलेल्या फ्रँचायझींचा तो पूर्णपणे स्वतःचा निर्णय असतो. त्या लीगमध्ये त्यांनी एखाद्या खेळाडूला घेतलं, तर त्याबाबत आम्हाला काहीही आक्षेप नाही. कारण आयपीएलमध्ये असा कोणताही खेळाडू नाही.”
द हंड्रेडमधील लिलावापूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की आयपीएल फ्रँचायझी मालकांनी विकत घेतलेल्या संघांकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नाही. गुरुवारी झालेल्या लिलावाच्या सुरुवातीच्या घडामोडींवरूनही तसंच चित्र दिसून आलं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि द हंड्रेडमधील आठही फ्रँचायझींनी गेल्या महिन्यात एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं. त्यामध्ये खेळाडूंची निवड पूर्णपणे त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरी, उपलब्धता आणि प्रत्येक संघाच्या गरजांवर आधारित असेल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
