scorecardresearch

T20 नंतर विराटकडून ODI चं कर्णधारपदही काढून घेणार?; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

टी-२० संघाचं कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे

BCCI, Virat Kohli, ODI Captaincy, ODI, One Day International,
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे (File Photo: PTI)

टी-२० संघाचं कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय विराट कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून त्याने पूर्वीच्या फॉर्मात यावं यासाठी बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकतं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेनंतर एकदिवस संघाच्या नेतृत्वात बदल केले जाऊ शकतात. ११ जानेवारी २०२२ पासून ही मालिका सुरु होणार आहे. टी-२० प्रमाणे एकदिवसीय संघाचं नेतृत्वही रोहित शर्माकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. तर के एल राहुलला उपकर्णधार केलं जाऊ शकतं.

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो. २५ नोव्हेंबरला कानपूरमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी संघाचं नेतृत्व करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माला दोन्ही कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुसरा कसोटी सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिका यांच्यात जास्त अंतर नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्माकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून बीसीसीआयने न्यूझीलंडविरोधातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये पहिला सामना खेळवला जाईल.

दरम्यान भारत दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन कसोटी सामने खेळणार आहे. १७ डिसेंबरला पहिला सामना होणार असून त्यानंतर तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-२० सामने खेळले जेणार आहेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये निराशा

विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकपसाठी खेळणाऱ्या भारतीय संघाने चाहत्यांची मोठी निराशा केली आहे. पहिल्याच दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे भारत उपांत्य फेरीदेखील गाठू शकला नाही.

यशस्वी कर्णधार, पण स्पर्धा जिंकण्यात अपयशी

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. २०१५ पासून त्याच्याकडे कसोटी संघाचं कर्णधारपद आहेत. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ९५ एकदिवसीय सामने खेळले असून यापैकी ६५ जिंकले असून २७ सामन्यात पराभव झाला. ९० किंवा त्याहून अधिक सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची तुलना करता हा चांगला रेकॉर्ड आहे. विजयी झालेल्या कसोटी सामन्यांचा आकडा पाहता कोहली यशस्वी कर्णधार आहे.

विराटच्या नेतृत्वात भारताने २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली होती. पण विराट कोहली कर्णधार म्हणून कोणतीही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 09:33 IST

संबंधित बातम्या