नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेदरम्यान खेळाडू, साहाय्यक आणि संघ अधिकार्यांच्या हॉटेल खोल्यांत अपरिचित किंवा परवानगी नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक बंदी घातली आहे. ‘हनी ट्रॅप’, कायदेशीर अडचणी आणि गंभीर सुरक्षा धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘बीसीसीआय’च्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीयू) स्पष्ट केले आहे.
‘आयपीएल’ सामन्यांदरम्यान संघांच्या डगआऊटमध्ये, तसेच संघांच्या बस आणि हॉटेलमध्ये परवानगी नसलेल्या काही व्यक्तींची उपस्थिती ‘एसीयू’ला आढळून आली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने कठोर पाऊल उचलताना सर्व १० फ्रँचायझींना सविस्तर पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. ‘बीसीसीआय’ने खेळाडू आणि साहाय्यकांसाठी कार्यपद्धती (एसओपी) जारी केली आहे. ‘‘खेळाडू किंवा अधिकार्यांच्या हॉटेल खोल्यांत कोणत्याही पाहुण्याला प्रवेश द्यायचा असल्यास संघ व्यवस्थापकाची लेखी परवानगी अनिवार्य असेल,’’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘उच्चस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये
‘हनी ट्रॅप’ आणि लक्ष्य करून फसविण्याच्या घटना सर्वज्ञात आहेत. कायद्यांतर्गत लैंगिक गैरवर्तनासंबंधी गंभीर आरोप उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फ्रँचायझींनी सतर्क राहावे,’’ असा इशाराही ‘बीसीसीआय’ने दिला आहे. ‘‘गैरवर्तन व नियम उल्लंघनाच्या घटनांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यास स्पर्धा, संबंधित फ्रँचायझी आणि ‘बीसीसीआय’च्या प्रतिमेला गंभीर धक्का बसू शकतो,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे.
अन्यही काही निर्बंध
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढतानाचा (व्हेपिंग) व्हिडिओ समोर आला होता. याचा थेट उल्लेख ‘बीसीसीआय’ने टाळला असला, तरी भारतीय कायद्यानुसार ई-सिगारेटवर बंदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘स्पर्धेच्या कोणत्याही ठिकाणी ई-सिगारेट किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थांचा वापर केल्यास तो ‘बीसीसीआय’ व ‘आयपीएल’ नियमांचे उल्लंघन ठरेलच, शिवाय भारतीय कायद्यांनुसार दखलपात्र गुन्हाही ठरू शकतो,’’ असे सचिव देवजित सैकिया यांनी नमूद केले.
ल्ल उशिरा बाहेर जाणे : खेळाडू आणि साहाय्यकांना संघाच्या हॉटेलमधून रात्री-अपरात्री बाहेर पडताना सुरक्षा समन्वय अधिकारी आणि संघ सचोटी अधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी ‘बीसीसीआय’ किंवा ‘आयपीएल’ ऑपरेशन्स चमूकडून केली जाऊ शकते. नियमभंग झाल्यास दंड, निलंबन किंवा अपात्रता अशी कारवाई होऊ शकते, असेही सैकिया यांनी स्पष्ट केले.
मालकांसाठी सूचना
काही फ्रँचायझी मालकांकडून सामना सुरू असताना खेळाडूंशी संपर्क साधणे, त्यांना मिठी मारणे किंवा मैदानावरील क्षेत्रात प्रवेश करण्याच्या घटना निदर्शनास आल्याचे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. ‘‘अशा प्रकारचे वर्तन हे नियमांचे उल्लंघन असून संघाच्या वातावरणात आणि सामन्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप मानले जाऊ शकते. त्यामुळे सामना सुरू असताना मालक किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना डगआऊट, ड्रेसिंग रूम किंवा मैदान परिसरात खेळाडूंशी थेट संवाद साधण्यास बंदी घालण्यात आली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले. त्यांचा कोणाताही चुकीचा हेतू नसला, तरी असे वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नसून गंभीर नियमभंग मानला जाईल, असेही ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.
अतिरिक्त मोफत तिकिटांच्या मागणीमुळे अंतिम सामना बंगळूरुबाहेर?
बंगळूरु : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) अतिरिक्त १०,०५७ मोफत तिकिटांची मागणी केल्यामुळे ‘आयपीएल’चा ‘प्ले-ऑफ’ आणि अंतिम सामना बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्राने शुक्रवारी दिली.
सामान्यत: गतविजेत्या संघाच्या मैदानावर अंतिम सामना खेळवला जातो. मात्र, यंदाचा अंतिम सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या घरच्या मैदानाऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ‘‘नियमानुसार केएससीएला स्टेडियम क्षमतेच्या १५ टक्के मोफत तिकिटांचा हक्क आहे. मात्र, संघटनेने त्याशिवाय आणखी १०,०५७ मोफत तिकिटांची मागणी केली होती,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्राने सांगितले.
