आयसीसी चॅम्पियन्स करंडक २०१७ साठी संघाची घोषणा करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंतची म्हणजेच आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांकडून संघांची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास सर्वच देशांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. मात्र चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पुढील दोन दिवसांमध्ये बीसीसीआयकडून संघाची घोषणा होण्याची शक्यतादेखील कमी आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयसीसीच्या नव्या वित्तीय मॉडेलमुळे बीसीसीआयकडून अद्याप संघाची घोषणा करण्यात न आल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयला आयसीसीचे नवे आर्थिक मॉडेल मंजूर नाही. या नव्या आर्थिक मॉडेलचा विरोध करत बीसीसीआयने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी आधीच दिली होती. या मॉडेलवरील अंतिम निर्णय आयसीसीच्या दुबईतील बैठकीत घेण्यात येणार आहे. सध्या आयसीसीची दुबईमध्ये बैठक सुरु असून २७ एप्रिलला बैठकीची सांगता होईल. या बैठकीच्या अखेरीस नव्या आर्थिक मॉडेलवर आयसीसीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. यानंतरच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्याचा अथवा न करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात येईल. क्रिकेट जगतात सध्या तीन देशांचे पारडे जड आहे. यामध्ये भारतासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. या तिन्ही देशांना क्रिकेट जगतात 'बिग थ्री' म्हटले जाते. आयसीसीच्या जुन्या आर्थिक मॉडेलनुसार या तीन देशांना मिळणारा महसूल इतर देशांच्या तुलनेत जास्त होता. यामुळेच या तीन क्रिकेट बोर्डांकडे सर्वाधिक पैसा आहे. आयसीसी आता जुन्या आर्थिक मॉडेलमध्ये बदल करणार आहे. आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलनुसार प्रत्येक सदस्य देशाला समान महसूल दिला जाणार आहे. बीसीसीआय नव्या आर्थिक मॉडेलच्या विरोधात आहे. 'क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता, सर्वाधिक महसूल देण्यात भारतासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तीन देशांना आयसीसीने अतिरिक्त लाभ द्यायला हवा,' अशी बीसीसीआयची भूमिका आहे.