ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी व्हावी, या हेतूने भारतीय पुरुष संघाला अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आपले कौशल्य अजमावण्याची संधी मिळणार आहे. इपोह येथे बुधवारपासून ही स्पर्धा सुरू होत आहे.

भारताचा पहिला सामना जपानबरोबर होणार आहे. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारताने आशियाई स्पर्धा जिंकून यंदाच्या ऑलिम्पिकसाठी तिकीट निश्चित केले होते. या स्पध्रेत भारताला विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी झुंज द्यावी लागणार आहे. गतवेळी भारताने येथे कांस्य पदक जिंकले होते. त्यापेक्षा अधिक चांगले यश मिळविण्याचे भारताचे ध्येय आहे. गतवर्षी भारताने जागतिक लीगमधील अंतिम स्पर्धेतही कांस्य पदक मिळविले होते. त्याचा फायदा भारतास येथे खेळताना मिळेल अशी अपेक्षा आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ऑलिम्पिकसाठी संघ निवडताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांना या खेळाडूंचे कौशल्य अजमावण्यासाठी येथील सामने उपयुक्त ठरणार आहेत. ‘‘युवा खेळाडूंच्या कामगिरीबाबत मला उत्कंठा आहे. ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूपच उत्तम व्यासपीठ आहे. मात्र त्यांनी येथे कोणतेही दडपण न घेता खेळले पाहिजे. प्रत्येक सामन्याप्रमाणे व्यूहरचनेबाबत नियोजन केले जाणार आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत टायब्रेकरमध्ये न्यूझीलंडने हरवले होते. भारताने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. याआधी २०११मध्ये भारताने दक्षिण कोरियाच्या साथीने संयुक्त विजेतेपद मिळवले होते. मुसळधार पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नव्हता व दोन्ही संघांना विजेते जाहीर करण्यात आले होते.
भारतीय संघाचे नेतृत्व सरदार सिंग करीत असून या संघाची मुख्य मदार उपकर्णधार एस. व्ही. सुनील, रुपिंदरपाल सिंग, कोठाजित सिंग व मनप्रीत सिंग आदी खेळाडूंवर आहे.