वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. यासाठी टीम इंडियाने इन्ट्रा स्कॉड संघ तयार केले असून सराव करत आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सलग तीन दिवस भारतीय संघ मैदानात घाम गाळत आहे. या सराव सामन्यात काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीची झळक दाखवली असून पूर्णपणे तयार असल्याचं दाखवून दिलं आहे. बीसीसीआय आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सरावाचे अपडेट देत आहे. तिसऱ्या दिवसातील सराव सामन्यात ऋषभ पंत शार्दुल ठाकुरची तक्रार करताना दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना त्याने तक्रार केली आणि हसला.

बीसीसीआयने तिसऱ्या दिवशीच्या हायलाइटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दुल ठाकुर थेट नेट्सच्या दिशेने गेला. यावर ऋषभ पंतने मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना तक्रार केली. या दरम्यान त्यांचं संभाषण रंगलं.

ऋषभ पंत– सर
रवि शास्त्री– काय झालं?
ऋषभ पंत– इशारा करत सांगितलं, शार्दुलला बघा
रवि शास्त्री– तो, सरळ तिथे गेला आहे का?
ऋषभ पंत– नेट्समध्ये थेट गेला आहे.

सराव सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात दिसून आला. त्याने ९४ चेंडूत १२१ धावांची खेळी केली. तर आपलं अर्धशतक त्याने षटकार ठोकत पूर्ण केलं. त्याचबरोबर शुभमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी चांगली फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर केएल राहुलने शतकी खेळी केली. अष्टपैलू रविंद्र जडेजाही चांगल्या फॉर्मात दिसून आला. त्याने ५४ धावा केल्या. तर गोलंदाजीत इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ आणि २ गडी बाद केले. त्यामुळे या दोघांपैकी संघात कुणाची निवड करायची? असा प्रश्न आता विराट कोहलीसमोर आहे.