उत्कंठापूर्ण शर्यतीत इथिओपियाच्या बेलाय अबादोयोने पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीमधील पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन शर्यतीचे विजेतेपद मिळवले. पुरुष व महिलांच्या आंतरराष्ट्रीय अर्धमॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे केनियाचे डॅनियल मुटेटी व दाकरेस किथोमी यांना विजेतेपद मिळाले.
व्यावसायिक धावपटू असलेल्या बेलायने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर दोन तास १७ मिनिटे ३५ सेकंदांत पार केले. केनियाच्या मैयो ओसमैदी याने त्यापाठोपाठ शर्यत पूर्ण करीत उपविजेतेपद पटकावले. इथिओपियाच्या मेकाक्षा अलेमूने तिसरा क्रमांक मिळवताना ही शर्यत बेलाय याच्यानंतर दोन शतांश सेकंदांनी पार केली. अर्धमॅरेथॉन शर्यतीत डॅनियलने २१ किलोमीटरचे अंतर एक तास, २ मिनिटे, १४ सेकंदांत पार केले तर इथिओपियाच्या ताफेसे अबेबेने उपविजेतेपद मिळवताना ही शर्यत एक तास, २ मिनिटे, २२ सेकंदांनी पूर्ण केली. महिलांमध्ये केनियाच्या दाकरेस किथोमी, हेलन मुस्योका व बेन्टू वोदाजो यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवत आपल्या देशाचे निर्विवाद वर्चस्व राखले.
मॅरेथॉन शर्यतीत केनिया व इथिओपियाच्याच खेळाडूंचे वर्चस्व असते. ही शर्यतही त्यास अपवाद ठरली नाही. लोकांना या शर्यतीमुळे वाहतुकीबाबत त्रास होऊ नये म्हणून मुख्य शर्यतीचा प्रारंभ खंडुजीबाबा चौकातून पहाटे साडेपाच वाजता सुरू करण्यात आला. या शर्यतीत बहुतांश वेळा केनिया व इथिओपिया यांचे धावपटू एकत्रितरीत्या धावतात व एकमेकांचा वेग ठेवत त्यानुसार आपला वेग वाढवतात. शहरातील मुख्य रस्त्यांवरून धाव घेताना २० ते २५ खेळाडू एकाच जथ्यात धावत होते. पहाटेच्या गारव्यामुळे त्यांची फारशी दमछाक झाली नाही. शर्यतीमधील निम्मा टप्पा पार झाल्यानंतरही केनिया व इथिओपियाच्या खेळाडूंचा जथ्थाच एकत्रित धावत होता. साधारणपणे ३०व्या किलोमीटरपासून पंधरा खेळाडू आलटूनपालटून आघाडीवर होते. शेवटच्या पाच किलोमीटर अंतरात या जथ्यामधील खेळाडूंमधील अंतर वाढत गेले. शेवटचे दीड किलोमीटर अंतर बाकी असताना बेलाय व मैयो यांनी अन्य सहकाऱ्यांपेक्षा काही मीटरची आघाडी घेतली. विजेतेपदाबाबत याच दोघांमध्ये चुरस निर्माण झाली. अखेर बेलाय याने मैयो याला मागे ठेवत ही शर्यत जिंकली.
पुणे मॅरेथॉन शर्यत
विजेतेपदाची खात्री होती. या शर्यतीकरिता मी खूप मेहनत केली होती. त्यामुळे येथे अव्वल कामगिरी करण्याचे माझे ध्येय होते. मैयो याने खूप चांगली लढत दिली, यामुळे शर्यतीत रंगत आली. भारतीय खेळाडूंमध्ये खूप नैपुण्य आहे. त्यांनी स्पर्धात्मक सरावावर भर दिला पाहिजे.
– बेलाय अबादोयो