Ben Duckett Jacob Bethell record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, इंग्लंडचे सलामीवीर जेकब बेथेल आणि बेन डकेट यांनी इतिहास घडवला. या दोन फलंदाजांनी लॉर्ड्सवर आपली छाप पाडली आणि भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडच्या संघाने लॉर्ड्सवरील सामन्यात आपला दबदबा कायम राखला आहे. भारतीय संघाला विकेट घेण्यासाठी फार मेहनत घ्यायला भाग पाडलं. दरम्यान डकेट व बेथेलने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. कर्णधार शुबमन गिल आणि भारतीय गोलंदाजांनी अवलंबलेली रणनीती इंग्लंडच्या बेथेल आणि डकेट यांच्यासमोर निष्फळ ठरली. या सलामीच्या जोडीने इंग्लंडला केवळ दमदार सुरुवातच करून दिली नाही, तर लॉर्ड्सच्या मैदानावर सलामीच्या जोडीने केलेल्या सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रमही मोडीत काढला.

सलामीवीर जेकब बेथेल आणि बेन डकेट यांनी आपली १३६ वी धाव पूर्ण करताच, या मैदानावर एकदिवसीय सामन्यातील पहिल्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा विक्रम ४६ वर्षांपासून म्हणजेच १९८० पासून जेफ्री बॉयकॉट आणि पीटर विली यांच्या नावावर होता; त्यांनी १३५ धावांची भागीदारी केली होती.

बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचली. लॉर्ड्सच्या मैदानावरील इतिहासात एकदिवसीय सामन्यात सलामीच्या फलंदाजांनी १५० हून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ होती. इंग्लंडच्या या सलामीच्या जोडीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमधील पहिल्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही प्रस्थापित केला. यापूर्वी हा विक्रम जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांच्या नावावर होता; त्यांनी २०१९ मध्ये सलामीला फलंदाजी करताना १६० धावांची भागीदारी केली होती.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी म्हणूनही डकेट आणि बेथेल यांनी नाव आपलं सोनेरी अक्षरात उमटवलं. त्यांनी २०१८ मध्ये जो रूट आणि इऑन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १८६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. लॉर्ड्सवर डकेट आणि बेथेल यांच्यात झालेली १९२ धावांची भागीदारी ही एकदिवसीय सामन्यांमधील कोणत्याही विकेटसाठीची चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

भारतीय गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी ३० व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. ३१वं षटक टाकणाऱ्या प्रसिध कृष्णाने पहिल्याच चेंडूवर जेकब बेथेलला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. बेथेलला शतक पूर्ण करता आलं नाही; त्याने ९३ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या. दरम्यान, बेन डकेटने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक पूर्ण केलं.