England Squad Announced for NZ vs ENG 2nd test: न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याकरता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. १७ जूनपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात मोठा बदल करण्यात आला आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे होणाऱ्या या सामन्यात इंग्लंड संघावर सर्वांच्या नजरा असतील, कारण संघाने इंग्लंडच्या संघात मोठे बदल केले, बेन स्टोक्स व गस अॅटकिन्सन यांना संघाबाहेर केलं आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंडविरुद्धच्या सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. पहिल्या सामन्यानंतर घडलेल्या एका नाईटक्लबमधील घटनेमुळे, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि पहिल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन यांना या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. ईसीबीने (ECB) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाचा अनुभवी खेळाडू जो रूट याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर चेल्सीमधील एका नाईटक्लबमध्ये बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन हे वादात अडकले होते. नाईट क्लबमधील रग्बी प्लेअरबरोबर झालेल्या वादाची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे केवळ स्टोक्सचे कर्णधारपदच नव्हे, तर त्याची संपूर्ण कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. हे प्रकरण संघाची शिस्त आणि ‘कर्फ्यू’च्या (वेळेच्या निर्बंधांचे) उल्लंघनाशी संबंधित असल्याचे ईसीबीने (ECB) स्पष्ट केलं असून, घटनेच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी केल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल.
‘द ओव्हल’ येथे १७ जूनपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन यांना संघातून वगळलं आहे, तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि जॉर्डन कॉक्स यांचा संघात समावेश केला आहे. आर्चर ११ जून रोजी इंग्लंडला परतणार असून, ‘ॲशेस’ मालिकेनंतर तो पहिल्यांदाच कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. तो या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कारण त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट विचारात घेतला जाईल. दरम्यान, यापूर्वी दीर्घकाळ कर्णधारपद भूषवलेल्या जो रूटने २०१७ ते २०२४ या काळात इंग्लंडचे विक्रमी ६४ कसोटी सामन्यांत नेतृत्व केलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
जो रूट (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलिओ गे, जेम्स रेव, ऑली रॉबिन्सन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जोश टंग.
