इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवल्यानंतर बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन एका नाईट क्लबमध्ये गेले होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसाठी कठोर नियमावली जारी केली आहे. यानुसार नाईटक्लबमध्ये जाण्यावरही मनाई आहे. स्टोक्सने या नियमांचं उल्लंघन केलं. नाईटक्लबमध्ये सरेसन्स रग्बी संघाच्या खेळाडूंबरोबर त्यांचं भांडण झालं. तूर्तास तरी या घटनेत कोणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे स्टोक्सला कर्णधारपद गमवावं लागू शकतं.
सोमवारी लॉर्ड्स कसोटी संपल्यानंतर स्टोक्स आणि अटकिन्सन नाईटक्लबमध्ये गेले. तिथे सेरेसन्स रग्बी संघाचे खेळाडूही होते. हंगाम संपल्यानंतर श्रमपरिहासाठी ते आले होते. यावेळी स्टोक्स-अटकिन्सन यांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. अटकिन्सन आणि रग्बी संघाच्या खेळाडूत वाद झाला. तो वाढत गेला. सरेसेन्स क्लबने अशा प्रकारची घटना घडली आहे याला पुष्टी दिली.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याआधीही स्टोक्स अशा प्रकारच्या वादात अडकला आहे. ते लक्षात घेता स्टोक्सकडून कर्णधारपद काढून घेण्यात येऊ शकतं. १७ जून पासून दुसरी कसोटी सुरू होत आहे. नियामकाकडे हे प्रकरण सोपवण्यात आल्याचं ईसीबीने म्हटलं आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर करण्यात येईल असंही ईसीबीने स्पष्ट केलं. दरम्यान स्टोक्सवर कारवाई झाल्याने तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नसेल तर हॅरी ब्रूककडे कर्णधारपद सोपवण्यात येईल. ब्रूकसुद्धा अशाच स्वरुपाच्या वादात अडकला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ब्रूकला तंबी देण्यात आली होती. त्यानंतरच ईसीबीने मिडनाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
गेल्या वर्षी स्टोक्सने सांगितलं होतं की त्याने मद्यप्राशन सोडून दिलं आहे. मात्र रविवारी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्टोक्स म्हणाला, ड्रेसिंगरुममध्ये सहकाऱ्यांबरोबर बीअर पित विजयाचा आनंद साजरा करायला आवडेल. जोवर मी त्यांच्याबरोबर जाऊन बीअर पित नाही तोपर्यंत आम्ही जिंकलोय असं वाटणार नाही असं स्टोक्स म्हणाला होता.
२०१७ मध्ये ब्रिस्टल इथे झालेल्या वनडेनंतर स्टोक्स रस्त्यावर मारामारी केली होती. या घटनेनंतर त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही खेळाडूंना इशारा दिला होता. तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करता. अनेक युवा खेळाडू तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. असं काही वर्तन करू नका ज्याने इभ्रत जाईल.
संघातील काही खेळाडू दारू प्यायल्यावर हाताबाहेर जातात अशी कबुली इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी दिली होती.
