इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वीच अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. वनडे आणि टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा स्टोक्स अविभाज्य भाग होता. इंग्लंडला अॅशेस जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता. कसोटी क्रिकेटमध्ये ७००० धावा आणि २५० विकेट्स अशी दुहेरी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे. सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टोक्सचं नाव घेतलं जाईल. हे सगळे विक्रम नावावर असलेल्या स्टोक्सने निवृत्त होता होता एक अनोखा दुर्मीळ विक्रम नावावर केला आहे.

शेवटच्या कसोटीत स्टोक्स दुसऱ्या डावात सलामीला आला होता. कारकिर्दीत प्रामुख्याने ५ आणि ६ क्रमांकावर खेळणाऱ्या स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सातव्या क्रमांकावर यायला सुरुवात केली होती. मात्र शेवटच्या कसोटीत सामना जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आक्रमक पवित्र्यानिशी खेळण्यासाठी स्टोक्स सलामीला उतरला. हे होताच कसोटीत सर्व क्रमांकवर खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. पण हा विक्रमाचा एक भाग झाला. स्टोक्सने गोलंदाजी करताना सर्व क्रमांकांवर म्हणजेच १ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला बाद केलं आहे. हे दोन्ही करणारा स्टोक्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला एकमेव खेळाडू आहे.

या विक्रमाची आणखी एक मेख आहे. ११विविध क्रमांकांवर खेळलेल्या फलंदाजांचे झेलही स्टोक्सने टिपले आहेत. हा विक्रम करणारा स्टोक्स पहिलाच आहे. संघाची जी आवश्यकता असेल त्यानुसार खेळणं हे स्टोक्सने प्रमाण मानलं. जगातल्या कुठल्याही संघात विशेषज्ञ फलंदाज किंवा विशेषज्ञ गोलंदाज म्हणून खेळायची ताकद स्टोक्सकडे होती. जगातल्या कुठल्याही संघात फक्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर प्रवेश मिळवण्याची क्षमता त्याच्याकडे होती. त्यामुळेच इंग्लंडला जशी आवश्यकता असेल त्यानुसार स्टोक्सने फलंदाजी केली, त्या क्रमांकावर फलंदाजी केली. गोलंदाजीही केली.

२०११ मध्ये स्टोक्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. तिन्ही प्रकारात मिळून अडीचशेपेक्षा जास्त सामने खेळल्यानंतर हा प्रवास थांबला. २०१९ वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये स्टोक्सने ८४ धावांची निर्णायक इनिंग्ज साकारली होती. तीन वर्षांपूर्वी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर स्टोक्सच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने ४ चेंडूत ४ षटकार खेचत थरारक विजय मिळवून दिला होता. स्टोक्सने त्या प्रसंगातून सावरत पुनरागमन केलं. त्याचवर्षी स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५८ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम स्टोक्सच्या नावावर आहे. स्टोक्सच्या नावावर कसोटीत १३८ षटकार आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी अडीच दिवसात जिंकली. त्यारात्री स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन नाईटक्लबमध्ये गेले होते. इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाने नाईटकर्फ्यू जारी केला आहे. या दोघांनी त्याचा भंग केला. नाईटक्लबमध्ये एका रग्बी खेळाडूशी त्यांची बाचाबाची झाली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण हाताबाहेर गेलं नाही. खेळाडू आणि कर्णधार म्हणून स्टोक्सच्या हातून नियमांचं उल्लंघन झालं. हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाची नाचक्की झाली. ओव्हल कसोटीसाठी या दोघांचा विचार करण्यात आला नाही. तटस्थ नियामकाद्वारे प्रकरणाची चौकशी झाली. यामध्ये स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन दोषी नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे दोघेही .. कसोटीसाठी संघात परतले. कसोटीच्या चौथ्या दिवशी स्टोक्सने हा आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल असं स्पष्ट केलं. ३५व्या वर्षी १२२ कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ४३ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व करून स्टोक्स निवृत्त झाला.

स्टोक्सने कसोटीत कोणत्या क्रमांकावर किती वेळा फलंदाजी केली आहे?

सलामीला- ३
३- २
४-६
५-३१
६-८१
७- १७
८- ४
९-१
१०-१
११-१
एकूण-१४७

स्टोक्सने कोणत्या क्रमांकावरच्या किती फलंदाजांना बाद केलं आहे?

सलामीवीर- ३७
३- २५
४- ३१
५- २६
६-२५
७- २२
८- २७
९- २७
१०- १७
११- १०
एकूण- २५२