Ben Stokes Explains reason behind his retirement: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू असतानाच स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच नाईट क्लबमधील हाणामारीच्या घटनेमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीमागे हीच घटना कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, स्टोक्सने स्वतः निवृत्तीमागचं खरं कारण सांगितलं आहे.

बेन स्टोक्सने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपल्या निवृत्तीबाबत संघाला माहिती दिली होती. त्यानंतर इंग्लंड संघाने कसोटी सामना सुरू असताना पोस्ट शेअर करत स्टोक्सच्या निवृत्तीची माहिती दिली. यामध्ये स्टोक्स संघाला आपल्या निवृत्तीबाबत सांगताना दिसत आहे. स्टोक्सच्या निवृत्तीबाबत सर्वांनाच कळताच चाहत्यांनी मैदानावर इंग्लंड संघाला चिअर करण्यास सुरूवात केली. निवृत्तीच्या घोषणेनंतर पुढचं षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टोक्सने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि कमालीचं सेलिब्रेशन केलं.

बेन स्टोक्सच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर भावनिक खुलासा

निवृत्तीनंतर स्काय स्पोर्ट्सशी बोलताना स्टोक्सने सांगितलं की, २०२५-२६ अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला १-४ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. “ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे थकलो होतो. मी माझ्या पत्नीला इतकंच सांगितलं की, ‘खरं सांगायचं तर या सगळ्यातून पुन्हा सावरून क्रिकेट खेळत राहण्याची ताकद आता माझ्यात उरली आहे असं मला वाटत नाही,'” असा भावनिक खुलासा स्टोक्सने केला.

स्टोक्सने पुढे सांगितलं की, जवळच्या व्यक्तींशी मन मोकळं करत गेल्यानंतर त्याला आपल्या निर्णयाबाबत अधिक स्पष्टता मिळू लागली. “खरंच तसंच झालं. तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेतून जाता, आपल्या जवळच्या लोकांशी बोलता आणि हळूहळू मनातल्या भावना व्यक्त करू लागता. मी माझ्या पत्नीशी आणि इतर जवळच्या व्यक्तींशी जितकं जास्त बोलत गेलो, तितकंच मला जाणवलं की मी या सगळ्या गोष्टी मनात खूप काळ मनात ठेवल्या होत्या,” असं स्टोक्सने सांगितलं.

भावनिक थकव्याबरोबरच ३५ वर्षीय स्टोक्सने वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना शरीरावर येणाऱ्या प्रचंड ताणाचाही उल्लेख केला. “आम्ही जे करतो, ज्याप्रकारे खेळतो ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण आहे. मैदानावरील खेळापेक्षाही त्यासाठी मैदानाबाहेर करावी लागणारी मेहनत अधिक दमवणारी असते. आता ३५व्या वर्षी स्वतःला फिट ठेवण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. देशासाठी मैदानात उतरायचं असेल तर त्यासाठी लागणारी झुंज माझ्यात अजून उरली आहे का, हा प्रश्न मी स्वतःलाच विचारत होतो. भावनिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्वच बाजूंनी विचार केल्यानंतर हीच योग्य वेळ असल्याचा निर्णय मी घेतला,” असा भावनिक खुलासा माजी इंग्लंड कर्णधाराने केला.