Ben Stokes Shocking Reaction On Wicket Taken By Washington Sundar: भारताचा संघ बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं आहे. इंग्लंडचे फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजांसमोर स्वस्तात बाद होत माघारी परतले. १०० विकेट्सच्या आत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. तर आता वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या दिवशी लंचच्या आधी स्टोक्सची महत्त्वाची विकेट मिळवली.
इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या अखेरीस ३ विकेट गमावल्या होत्या. तर पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच पहिल्या ५-६ षटकात दोन विकेट गमावत इंग्लंडचा निम्मा संघ माघारी परतला. यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ यांनी ७० धावांची भागीदारी करत इंग्लिश संघाचा डाव सावरला. पण वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर मात्र तो गडबडला.
बेन स्टोक्स फिरकीविरूद्ध फलंदाजी करताना थोडा गडबडत होता. लंचआधी जडेजा आणि सुंदर गोलंदाजी करत होते. त्यांच्या गोलंदाजीवर स्टोक्स धावा करू शकत नव्हता. हे पाहून लंचच्या आधी एक षटक टाकण्याचा निर्णय घेतला आणि सुंदरला गोलंदाजी दिली.
सुंदर ४१वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर धाव करू शकला नाही. दुसऱ्या चेंडूवर चेंडू बॅटला लागून पंतच्या हातात गेल्याचं वाटलं. पण भारताने रिव्ह्यू घेतला नाही, कारण चेंडू बॅटऐवजी मांडीच्या पॅडला लागून गेला होता. तिसऱ्या चेंडू सुंदरने कमालीचा टाकला आणि चेंडू खेळण्याच्या आधी त्याच्या पॅडवर आदळला. स्टोक्सला वाटलं त्याने चेंडू खेळून काढला. पण तोपर्यंत भारतीय संघाने अपील केलं होतं आणि पंचांनी त्याला बाद दिलं.
पंचांनी बाद देताच स्टोक्स अवाक् झाला. त्याला वाटलं त्याने चेंडू खेळून काढला आहे. पंचांच्या दिशेने पुढे येत असताना त्याने हातवारे करत कसा काय बाद असू शकतो असं म्हणताना दिसला. स्टोक्सने रिव्ह्यू घेतला, पण रिव्ह्यूमध्ये चेंडू पहिला थेट पॅडवर आदळलेला दिसला. बॉल ट्रॅकिंगमध्येही स्टम्पवर चेंडू आदळत होता. त्यामुळे स्टोक्सला बाद होत मैदानाबाहेर जावं लागलं.
इंग्लंडने संघाने लंच ब्रेकपर्यंत ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी अद्याप ४५५ धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज आहे.