Ben Stokes Shouts on Umpire Over Yashasvi Jaiswa DRS Controversy: भारत वि. इंग्लंड दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्स यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मैदानात चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. यादरम्यान त्याने पंचांशीही वाद घातला. भारताने इंग्लंडला तिसऱ्या दिवशी ४०७ धावांवर सर्वबाद केलं. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी ३०३ धावांची भागीदारी रचत संघासाठी मोठी धावसंख्या उभारली. तर मोहम्मद सिराजने ६ विकेट्स आणि आकाशदीपने ४ विकेट्स घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला. पण भारताच्या दुसऱ्या डावात स्टोक्स का संतापला, जाणून घेऊया.
भारताने इंग्लंडला ४०७ धावांवर सर्वबाद केल्याने भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावाला चांगली सुरूवात करत संघाच्या सलामीवीरांनी झटपट धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी चौकारांची आतिषबाजी करत झटपट ५० धावांची भागीदारी रचली. भारताने ७.२ षटकांत ५० अधिक धावांचा पल्ला गाठला.
जोश टंगच्या षटकात राहुल आणि यशस्वी यांनी अर्धशतकी भागीदारी तर केलीच. पण भारताला पहिला झटकाही बसला. भारताने यशस्वी जैस्वालच्या रूपात पहिली विकेट गमावली. जोश टंगने आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर जैस्वालला चकित केलं आणि त्याला पायचीत केलं. टंगने टाकलेला चेंडू थेट जाऊन जैस्वालच्या पॅडवर आदळला आणि त्यांनी पायचीतचं अपील केलं. पंचांनीही बऱ्याच वेळाने आऊट असल्याचा इशारा केला.
बेन स्टोक्स अचानक पंचांवर का संतापला?
निराश झालेला यशस्वी जैस्वाल राहुलबरोबर रिव्ह्यूकरता चर्चा करण्यासाठी त्याच्याइथे पोहोचला. राहुलबरोबर चर्चा सुरू झाल्यावर रिव्ह्यूसाठी स्टॉपवॉच सुरू झालं. दोघंही चर्चा करत होते आणि वेळ ७,६,५,४,३,२,१ आणि ० होऊन स्टॉपवॉच स्क्रिनवरून जात असताना जैस्वालने रिव्ह्यूची मागणी केली. पंचांनी लगेच रिव्ह्यूसाठी इशारा केला.
तितक्यात जैस्वालच्या विकेटचा आनंद साजरा करणाऱ्या इंग्लंड संघाच्या घोळक्यातून बेन स्टोक्स मोठ्याने ओरडत पंचांजवळ येऊ लागला. बेन स्टोक्स ए नाही नाही असं म्हणत पंचांजवळ आला. स्टोक्सच्या मते यशस्वी जैस्वालने वेळ निघून गेल्यानंतर रिव्ह्यूचा इशारा केला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या पंचांपर्यंत रिव्हयू जाऊच शकत नाही, असं स्टोक्सचं म्हणणं होतं. तो हातवारे करत पंचांना नाही नाही म्हणत त्यांच्याजवळ येऊन चर्चा करत होता.
बेन स्टोक्स बोलण्यासाठी येताच इंग्लंडच्या चाहत्यांनीही टीम इंडियाची हुर्याे उडवण्यासाठी सुरूवात केली. तितक्यात मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांशी चर्चा करून हा रिव्ह्यू घेण्यात येईल असं सांगितलं. तिसऱ्या पंचांनी सांगितलं की जैस्वालने वेळेत रिव्ह्यू घेतला आहे, त्यामुळे तो मान्य केला जाईल. रिव्ह्यू घेण्यात आला पण चेंडू स्टम्पसवर आदळल्याचे डीआरएसमध्ये दिसून आल्याने यशस्वी जैस्वालला बाद देण्यात आलं आणि निर्णय इंग्लंडच्या बाजूने लागला.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत १ विकेट गमावत ६४ धावा केल्या आहेत. यासह आता भारताकडे २४४ धावांची आघाडी आहे. राहुल २८ धावा तर करूण नायर ७ धावा करत नाबाद माघारी परतला आहे.