सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकणारा इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश स्पर्धेतील अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने स्टोक्सला ताफ्यात समाविष्ट केलं आहे. बिग बॅश स्पर्धेतला स्टोक्स सगळ्यात जास्त कमाई करणारा खेळाडू ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे स्टोक्स संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल. बिग बॅश स्पर्धेत नवीन करारपद्धती लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत करारबद्ध होणारा स्टोक्स पहिलाच खेळाडू आहे. फ्रँचाइजींना खेळाडूंना थेट करारबद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे.
७न्यूजने दिलेल्या बातमीनुसार स्टोक्ससाठी अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने ५००,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी रक्कम खर्च केल्याचं समजतं. येत्या आठवड्यात अन्य संघ आणखी काही विदेखी खेळाडूंना संघात समाविष्ट करतील.
स्टोक्सला संघात घेण्यासाठी बिग बॅश स्पर्धेतील अनेक संघ उत्सुक होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या स्ट्रायकर्स संघाने स्टोक्ससाठी पुढाकार घेतला. २०१९ अॅशेस मालिकेतील ऐतिहासिक अशा हेडिंग्ले कसोटीतील विजयात स्टोक्सने सिंहाची भूमिका बजावली होती. त्यावेळी टीम पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता.
स्ट्रायकर्स संघाकडून खेळण्यासाठी मी आतूर आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. अॅडलेड ओव्हल हे क्रिकेट खेळण्यासाठी अतिशय सुरेख असं मैदान आहे. बिग बॅश ही मोठी स्पर्धा आहे. अॅडलेड स्ट्रायकर्स हा स्पर्धेतल्या अव्वल संघांपैकी एक आहे. संघातल्या बाकी खेळाडूंना भेटायचं आहे. संघाच्या विजयात १०० टक्के योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असेन असं स्टोक्सने म्हटलं आहे.
सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टोक्सचं नाव घेतलं जातं. दडपणाच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करण्यात तो माहीर आहे. त्याच्यासारख्या क्षमतेचा खेळाडू संघात दाखल झाला आहे याचा आनंद आहे असं टीम पेननं म्हटलं आहे.
अॅशेस मालिकेत दारुण पराभवानंतर स्टोक्स ऑस्ट्रेलियात पुनरागमन करत आहे. स्टोक्सने न्यूझीलंड मालिकेत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. या मालिकेतली पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. त्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टोक्स आणि संघातील काही सहकारी नाईटक्लबमध्ये गेले होते. इंग्लंड संघासाठी कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांची नाईटक्लबमध्ये रग्बी खेळाडूशी वादावादी झाली. यानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताबाहेर जाऊ दिलं नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांच्यावर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या कसोटीसाठी त्यांचा संघनिवडीसाठी विचार झाला नाही. तटस्थ निरीक्षकाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये स्टोक्स आणि अॅटकिन्सन दोषी नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे स्टोक्स-अॅटकिन्सन यांचा खेळायचा मार्ग मोकळा झाला. स्टोक्सने तिसऱ्या कसोटीदरम्यान निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. काही दिवसांनंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आलं. स्टोक्स-मॅक्युलम जोडीने अतिआक्रमक पद्धतीने खेळण्याचा मार्ग अवलंबला होता. सुरुवातीला विजय मिळाले मात्र त्यानंतर या पद्धतीतला फोलपणा स्पष्ट झाला.
स्टोक्स २०१४-१५ मध्ये बिग बॅश स्पर्धेतल्या मेलबर्न रेनेगड्स संघाकडून खेळला होता. २०२४ नंतर स्टोक्स टी२० प्रकारात खेळला नाहीये. द हंड्रेड स्पर्धेत खेळताना स्टोक्सच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. आयपीएल स्पर्धेत स्टोक्स तीन संघांकडून खेळला आहे. २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने १४.५ कोटी रुपये खर्चून स्टोक्सला संघात घेतलं होतं. २०२३ मध्ये चेन्नईने नेहमीच्या खाक्याला छेद देत स्टोक्ससाठी १६.२५ कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च केली होती. त्याआधी तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. आयपीएल स्पर्धेत स्टोक्सने दोन शतकी खेळीही साकारल्या आहेत.
२०२२ मध्ये आयोजित टी२० वर्ल्डकप स्पर्धेत फायनलच्या मुकाबल्यात स्टोक्सने नाबाद ५२ धावांची खेळी करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं. स्टोक्सने १२२ कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ४३ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
