२०१७ म्हणजे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आयपीएलची मॅच कव्हर करण्याच्या निमित्ताने वानखेडे मैदानावर पोहोचलो. मुंबई आणि पुणे संघाची मॅच होती. दोन्ही संघांच्या बसेस मैदानात दाखल झाल्या होत्या. खेळाडू स्थिरस्थावर होत होते. तेवढ्यात दोन माणसं डगआऊटमधून बाहेर पडली. एक माणूस पार स्टंपच्या इथे गेला. दुसरा माणूस एकदम बाऊंड्रीवर जाऊन उभा राहिला. स्टंपच्या इथे उभा राहिलेला माणूस हातात बेसबॉलचा ग्लोव्हज घेऊन बॉलसह उभा होता. बाऊंड्रीवरच्या माणसाने रेडी म्हटलं आणि कॅच घेण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. ५ मिनिटं लुटुपुटीचे कॅच घेतल्यानंतर त्या स्टंपजवळच्या माणसाने बॉल अगदी जवळच हवेत उडवला. बाऊंड्रीवरचा माणूस काही पकडू शकणार असं दिसत होतं. पण तो माणूस जोरात धावू लागला. एकाक्षणी बॉल जमिनीवर पडणार अशी स्थिती असताना त्या माणसाने माशासारखी सुळकी मारून अशी डाईव्ह लगावली की बॉल त्या माणसाच्या सुपासारख्या हातात जाऊन विसावला होता.

मैदानात लवकर जमलेल्या चाहत्यांच्या तोंडून वॉव वगैरे बाहेर पडलं. त्या बाऊंड्रीवरच्या माणसाच्या दोन्ही कोपरांवरची सगळी सालं निघाली होती. नाकालाही लागलं होतं. त्या माणसाचं नाव होतं- बेन स्टोक्स. मोठ्या माणसांकडून वर्कएथिक शिकावं असं म्हणतात. स्टोक्सने तिथे जमलेल्या सगळ्यांना डेमोच दिला. त्यानंतरही उजवीकडे-डावीकडे कॅचसाठी त्याचं डाईव्ह टाकणं सुरूच राहिलं. ३५ मिनिटांनंतर स्टंपशी उभ्या असलेल्या माणसाला त्याने पुरे म्हटलं आणि ते सत्र संपलं. बेन स्टोक्स या अवलियाचं ते दर्शनमात्रे भारावून टाकणारं होतं. भारावून यासाठी कारण म्हटलं तर ही जनरल फिल्डिंग प्रॅक्टिस होती. पण कोणीही सांगितलेलं नसताना आणि जगातल्या दर्जेदार क्षेत्ररक्षकात गणना होत असताना स्वाध्याय म्हणून केलेलं ते आन्हिक होतं.

पिंगट वर्ण, लालसर ब्राऊन रंगाचे केस आणि दाढी, आहेत की नाहीत कळणार नाहीत अशा भुवया, हिरवे-निळे असे भेदक डोळे, खूप सारे टॅटू आणि व्यक्तिमत्वात जाणवणारा आत्मविश्वास. मी करून दाखवतो हे वाक्य बेन स्टोक्सचं जीवनसूत्र आहे. करून दाखवण्याला उद्दामतेचा दर्प नाही, उलट विश्वास ठेवा- मी करतो काम अशी आश्वस्त करणारी झालर आहे. धावा करणं, विकेट्स काढणं, रनआऊट करणं, कॅच टिपणं, कर्णधारपद सांभाळणं- तुम्ही बिनघोर राहा, मी करतो असा एक अदृश्य संदेश स्टोक्सच्या व्यक्तिमत्वातून, देहबोलीतून प्रेरित होतो. अष्टपैलूतेला एक ना धड भाराभार चिंध्या होण्याची भीती असते. स्टोक्सच्या बहुपेडीपणाचं तसं होत नाही.

एक विशिष्ट काम करताना तो इतकं तादात्म्य पावतो की असं वाटावं की त्याला तेवढंच काम येतं. दुसरं काम करायला घेतलं की तशीच तन्मयता असते. अनेक कामं करू शकणारी दोन माणसं आहेतं असं स्टोक्सला खेळताना पाहून वाटतं. एक स्किलसेट दाखवताना दुसऱ्यावर अन्याय होत नाही. बरं सगळंच करत असल्यामुळे मी दमलो असंही तो म्हणत नाही. बॅट्समन स्टोक्स बॉलर स्टोक्सवर कुरघोडी करत नाही. या दोघांकडे फिल्डर स्टोक्स असूयेने पाहत नाही. खेळात प्रोसेस महत्त्वाची असली तरी जिंकण्याला अपार महत्त्व आहे. विजयीकुंकुम भाळी लागल्याशिवाय कर्तृत्व सिद्ध झाल्याचं व्यवस्था मानत नाही. स्टोक्स श्रद्धेय भावनेने प्रोसेस पार पाडतोच पण जिंकण्याचं अवघड आव्हानही पेलतो.

२०१६ ट्वेन्टी20 वर्ल्डकप फायनल.कोलकाताचं इडन गार्डन्स मैदान. लाखभर चाहते बसलेले. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी १९ धावा हव्या होत्या. शाळकरी मुलगाही सांगेल की वर्ल्डकप फायनलला हे समीकरण तसं अवघडच. इंग्लंडचा कर्णधार आयोन मॉर्गनने चेंडू सोपवला बेन स्टोक्सच्या हाती. पुढच्या दहा मिनिटात अविश्वसनीय असं घडलं. कार्लोस ब्रेथवेट या शक्तिशाली कार्यकर्त्याने चार चेंडूत चार षटकार हाणले आणि वेस्ट इंडिजने थरारक विजय संपादला. असं घडले अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. गुडघ्यात डोकं घालून बसलेला स्टोक्स जगभरातल्या क्रिकेटचाहत्यांच्या लक्षात आहे. लाखभर लोकांच्या साक्षीने पराभवाचं खापर असं फुटावं…. तेव्हा मैदानातून लालसर डोळ्यांनी, खांदे पडलेल्या स्टोक्सला डगआऊटपर्यंत जाताना कोणी पाहिलं असतं तर आतून मोडून गेलं असतं. त्या प्रसंगाने स्टोक्स खचला नाही, उलट तो त्वेषाने उफाळू लागला. कार्लोस ब्रेथवेट त्या क्षणानंतरही फार बहरलाच नाही पण स्टोक्स फुलत गेला, कणाकणाने. तेव्हापासून स्टोक्स करून दाखवण्याचं आव्हान पेलतोय. जितकं जास्त दडपण, जितकी मोठी स्पर्धा तितकं स्टोक्स भात्यातून एकेक कर्तृत्वाविष्कार बाहेर काढतो.

चार वर्षांपूवी वर्ल्डकपची फायनल. मोठं व्यासपीठ. ज्यांनी जगाला क्रिकेट शिकवलं त्यांची झोळी वर्ल्डकपविना होती. स्टोक्सने अशी एक इनिंग्ज साकारली की डोळ्याचं पारणं फिटावं. या खेळीदरम्यान अनवधानाने क्षेत्ररक्षकाने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. स्टोक्सने तत्क्षणी दोन्ही हात वर करून सॉरी म्हटलं. त्याचा दोष नव्हता, तो जीवांच्या आकांताने धावत होता. त्या प्रसंगाला हँड ऑफ गॉड असं म्हटलं गेलं. तिथून मॅच फिरली आणि इंग्लंडचं नशीब हसलं. प्रतिस्पर्ध्यांच्या पारड्यात जाऊ लागलेला सामना स्टोक्सने खेचून आणला.

त्याच वर्षी हेडिंग्ले इथे स्टोक्सने अ‍ॅशेस मालिकेदरम्यान अद्भुत अशी खेळी साकारली. कसोटीचा शेवटचा दिवस. चौथी इनिंग्ज. जिंकण्यासाठी ३५९चं लक्ष्य. शेवटचा भिडू जॅक लिच मैदानात आला तेव्हा २८६/९ अशी स्थिती. सामन्यावर ऑस्ट्रेलियाची घट्ट पकड जमलेली. स्टोक्सने तिथून पण केला की करून दाखवूयाच. तिथून पुढच्या तासाभरात जे घडलं ते विलक्षण होतं. स्टोक्सने चाबूक फिरवावा तशी बॅट चालवली. मैदानात चौफेर तो चेंडूला पिटाळत राहिला. ऑस्ट्रेलियाचा संघ एका विकेटपासून दूर होता. अशक्य वाटणारा विजय स्टोक्सने प्रत्यक्षात साकारला. कसोटी क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान खेळींमध्ये त्या शतकाची नोंद झाली.

सलामीवीर, मधली फळी यांची दाणादाण उडालेय- स्टोक्स मैदानात उतरतो, हळूहळू करत धावांची वीण गुंफतो. संघाला संकटातून बाहेर काढतो. सुरुवातीच्या कार्यकर्त्यांनी पाया रचला असला तर स्टोक्स नंतर येऊन कत्तलखाना उघडतो. क्षेत्ररक्षण करताना त्याला मैदानात कुठेही उभा करा, तो झोकून देतो. अनेकदा मुख्य गोलंदाजांची पिटाई झाली की स्टोक्स येतो, हमखास भागीदारी तोडतो. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्टोक्सची भूमिकाच बदलून गेली. तो मुख्य गोलंदाज झाला आणि नवा चेंडू हाताळू लागला. तेही काम तो इमानेइतबारे करू लागला. या माणसाला नेमक्या किती गोष्टी येतात याचा अंदाजच येत नाही. बघता बघता वर्ल्डकपची फायनल आली. पहिली इनिंग्ज झाली. छोटेखानी लक्ष्य मिळालं पण खेळपट्टी फसवी आणि समोर दर्जेदार गोलंदाजांचा ताफा. दोन भिडू गारद झालेले. स्टोक्स मैदानात अवतरला. समोर वर्ल्डकपचा करंडक. युवा गोलंदाजाच्या गोळीबंद आक्रमणाने पार नामोहरम झाला. दोनदा तर रनआऊटही झाला असता. शौर्यवानांना नशीब साथ देतं म्हणतात. स्टोक्स झगडत-झुंजत राहिला. वर्ल्डकप घेतल्याशिवाय मी जात नसतो हे त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होतं. स्टोक्सने त्याचं मनातलं खरं करून दाखवलं. विजयी धाव घेतली आणि एकच जल्लोष झाला. मोठं व्यासपीठ, प्रचंड दडपण आणि तिथे स्टोक्स नाही असं होऊ शकत नाही.

स्टोक्सला पाहताना तो क्रिकेट खेळतोय असं वाटत नाही. दररोज हरघडी चहूबाजूंनी उभं राहणाऱ्या अडथळ्यांना-समस्यांना पुरुन उरणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं प्रतीक होतो. स्टोक्स परिस्थिती खरवडायला- उकरायला शिकवतो. स्टोक्स समोरच्या आव्हानाला मागे कसं रेटायचं ते दाखवतो. बलशाली आक्रमणावर मांड ठोकून शिरजोर कसं व्हायचं याचं प्रात्यक्षिक स्टोक्स सातत्याने देतो. तुम्ही जितकं नडाल तेवढ्या त्वरेने वर येण्याचं कसब स्टोक्स देतो. घायाळ होणं म्हणजे कमकुवतपणा नसून जखमा अभिमानाने मिरवण्याचं धारिष्ट्य स्टोक्स देतो. आपल्याला पाडणाऱ्या मातब्बर समोरच्याचं श्रेष्ठत्व मान्य करण्याचं काळीज स्टोक्स देतो. पळपुटेपणाची भीती स्टोक्स घालवून टाकतो आणि निधड्या छातीची ढाल देतो. स्टोक्स खेळाडू म्हणून राहतच नाही तो जिताजागता प्रेरणाकुंभ होतो जो जगायला बळ देतो.

स्टोक्सचं वैयक्तिक आयुष्य रोलरकोस्टरसारखं. उत्तुंग प्रतिभेला शाप असल्याचं म्हणतात. नाईटक्लबबाहेर बाचाबाची प्रकरण झालं. स्टोक्सला अटकही झालं. प्रकरण कोर्टात गेलं. खटला चालला. सेलिब्रेटी वादात अडकल्यानंतर जे जे व्हायचं ते झालं. अखेर स्टोक्स दोषी नसल्याचं सिद्झ झालं पण तोपर्यंत बरंच नुकसान झालं होतं. दारु पिऊन गाडी चालवणं असो, वादावादी असो- शिस्तभंगाच्या कारवायांपायी त्याने स्वत:ची हानी करून घेतली आहे. वडिलांच्या जाण्याने अस्वस्थ झालेल्या स्टोक्सने मानसिक आरोग्यावर लक्ष द्यायचं ठरवलं. त्यासाठी ऐन उमेदीत ब्रेकही घेतला. पॅनिक अटॅकसाठी औषधोपचार सुरू आहेत. मला हे सांगताना वैषम्य वगैरे वाटत नाही असं स्टोक्स स्पष्टपणे सांगतो. यासंदर्भात एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे. त्यात स्टोक्स मानसिक आरोग्याच्या प्रश्नांना कसा पुरुन उरला ते सांगतो. ज्याला पाहून कणखर वाटतं तो स्टोक्स या सगळ्यातून गेला असेल यावर विश्वास बसत नाही.

हे सगळं मागे टाकून स्टोक्स परतला आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार आहे. दोन वर्ल्डकपविजेता आहे. दोन्हीच्या फायनलमध्ये सामनावीर आहे. अजून काय पाहिजे. अवघड काहीतरी समोर ठेवा- स्टोक्स समोर असेलच.

असमान्य प्रतिभेच्या कारकिर्दीची अखेर वादातूनच व्हावी हे स्टोक्सचं आणि पर्यायाने इंग्लंडचं दुर्देव. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स कसोटी अडीच दिवसात जिंकत इंग्लंडने दणक्यात सुरुवात केली. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू बाहेर पडले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मिडनाईट कर्फ्यू लागू केला आहे. स्टोक्सने तो तोडला. नाईटक्लबमध्ये एका रग्बी खेळाडूशी त्याची आणि वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन यांची बाचाबाची झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सेक्युरिटी स्टाफने दोघांना तिथून सुरक्षित ठिकाणी नेलं. शिस्तभंगाची कारवाई म्हणून स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांना दुसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आलं. यादरम्यान चौकशी करण्यात आली. या घटनेत स्टोक्स दोषी नसल्याचं आढळलं. यामुळे तिसऱ्या कसोटीत स्टोक्सचा संघात समावेश करण्यात आला. स्टोक्स परतला पण कायमचं निघून जाण्यासाठीच. कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळी त्याने सहकाऱ्यांना निवृत्तीची कल्पना दिली. आठवडाभरात जे घडलं त्या पार्श्वभूमीवर स्टोक्सचा निर्णय धक्कादायक नक्कीच नव्हता. पण अवघड आव्हानं पार करणाऱ्या किमयागाराच्या कारकिर्दीची अखेर अशी नामुष्कीतून व्हावी याहून वाईट काय…