लंडन : भरपाई वेळेतील अगदी अखेरच्या मिनिटाला गोलरक्षक ॲनाटोली ट्रुबिनने केलेल्या गोलच्या जोरावर बेन्फिकाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत बलाढ्य रेयाल माद्रिदला ४-२ असा पराभवाचा धक्का दिला. या निकालासह बेन्फिकाने बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’मध्येही स्थान मिळवले.
चॅम्पियन्स लीगच्या नव्या स्वरूपानुसार, ३६ पैकी केवळ अव्वल आठ संघ थेट बाद फेरी गाठतात. गुणतालिकेत नवव्या ते २४व्या स्थानावर असणाऱ्या संघांना बाद फेरी गाठण्यासाठी ‘प्ले-ऑफ’ लढत खेळावी लागते. २५ ते ३६व्या स्थानावरील संघ थेट स्पर्धेबाहेर होतात.
बेन्फिका संघ नियमित ९० मिनिटांअंती रेयालविरुद्ध ३-२ असा जिंकत होता. मात्र, त्यानंतरही ‘प्ले-ऑफ’च्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना आणखी एका गोलची आवश्यकता होती. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील आठव्या मिनिटाला बेन्फिकाला फ्री-किक मिळाली. यावेळी रेयालचे माजी आणि बेन्फिकाचे विद्यमान प्रशिक्षक जोसे मोरिन्यो यांनी गोलरक्षकासह सर्वच खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याच्या गोलकक्षात जाण्याची सूचना केली. याचा बेन्फिकाला फायदा मिळाला. फ्रेडरिक ऑरसनेसच्या क्रॉसवर उंचपुऱ्या ट्रुबिनने हेडरच्या साहाय्याने गोल करत बेन्फिकाला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लगेचच पंचांनी सामना संपल्याची घोषणा केली आणि बेन्फिकाने अखेरच्या २४व्या स्थानासह बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’साठी पात्रता मिळवली.
‘‘आमच्यासाठी हा ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वाचा विजय होता. ट्रुबिन हेडरमार्फत गोल करू शकतो हे आम्हाला ठाऊक होते. केवळ योग्य ठिकाणी पास देणे आवश्यक होते. या विजयाने आम्ही खूप खुश आहोत,’’ असे बेन्फिकाचे प्रशिक्षक मोरिन्यो लढतीनंतर म्हणाले. या लढतीत बेन्फिकासाठी आंद्रेयास शेल्डेरूपने दोन, तर वॅन्गेलिस पावलिडिस आणि ट्रुबिन यांनी एकेक गोल केला. रेयालचे दोनही गोल किलियन एम्बापेने नोंदवले. या पराभवामुळे रेयालची गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे त्यांनाही बाद फेरीच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळावे लागेल.
चेल्सी थेट बाद फेरीत
चेल्सीने तुल्यबळ नॅपोलीचा ३-२ असा पराभव करत थेट बाद फेरीत प्रवेश केला. पूर्वार्धातील पिछाडीनंतर उत्तरार्धात दमदार पुनरागमन करताना चेल्सीने हा विजय साकारला. चेल्सीसाठी आघाडीपटू ज्वाओ पेड्रोचे दोन गोल निर्णायक ठरले. अन्य लढतीत बार्सिलोनाने कोपेनहेगनला ४-१ असे पराभूत केले. चेल्सी, आर्सेनल, लिव्हरपूल, टॉटनहॅम आणि मँचेस्टर सिटी या पाच इंग्लिश संघांसह बायर्न म्युनिक, बार्सिलोना, स्पोर्टिंग लिस्बन या गुणतालिकेतील अव्वल आठ संघांनी थेट बाद फेरी गाठली. गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेनला ‘प्ले-ऑफ’ लढत खेळावी लागेल. साखळीत पॅरिसला आठपैकी चार लढतीच जिंकता आल्या.

