scorecardresearch

बेन्झेमा, पुटेयासला ‘युएफा’च्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

करिम बेन्झेमा आणि अ‍ॅलेक्सिया पुटेयास यांना ‘युएफा’चा अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

बेन्झेमा, पुटेयासला ‘युएफा’च्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
करिम बेन्झेमा आणि अ‍ॅलेक्सिया पुटेयास

एपी, इस्तंबूल : करिम बेन्झेमा आणि अ‍ॅलेक्सिया पुटेयास यांना ‘युएफा’चा अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. चॅम्पियन्स लीगमध्ये १५ गोल झळकावत बेन्झेमाला पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी सर्वाधिक पसंती मिळाली. रेयाल माद्रिदला १४वे युरोपियन जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बार्सिलोनाला महिलांच्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक योगदान देणाऱ्या पुटेयासने ‘युएफा’ महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावला. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये स्पेनचे नेतृत्व ती करणार होती, मात्र स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांआधी तिला गुडघ्याची दुखापत झाली. पुरुषांच्या चॅम्पियन्स लीगची कार्यक्रमपत्रिका जाहीर केल्यानंतर पुटेयासने आपला पुरस्कार स्वीकारला.

रेयाल माद्रिदचे कार्लो अँसेलोटी आणि इंग्लंडला युरो २०२२चे जेतेपद मिळवून देणाऱ्या सरिना विग्मन यांना गेल्या हंगामातील सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. ज्या प्रशिक्षकांचे संघ युरोपियन स्पर्धामध्ये खेळले आणि युरोपमधील निवडक पत्रकारांनी या पुरस्कारांसाठी मतदान केले. माद्रिदचा गोलरक्षक थिबॉट कोटरेइस, मँचेस्टर सिटीचा मध्यरक्षक केव्हिन डी ब्रुएने या दोन खेळाडूंना मागे टाकत बेन्झेमाने पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले.

अँसेलोटी यांनी जर्गन क्लॉप (लिव्हरपूल) आणि पेप गार्डिओ (मँचेस्टर सिटी) यांना मागे टाकले. पुटेयासने  इंग्लंडची आघाडीपटू बेथ मीड आणि जर्मनीची मध्यरक्षक लेना ओबरडॉर्फ यांना मागे टाकले. विएगमनने जर्मनीच्या मार्टिना वोस-टेकलेनबर्ग आणि लियॉनच्या सोनिया बोम्पास्टर यांच्यावर मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.