भविष्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदाची निवडणूक नक्कीच लढवेन, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भूतियाने व्यक्त केले आहे.

जवळपास दशकभर ‘भारतीय फुटबॉलचा चेहरा’ म्हणून ओळखला जाणारा भूतिया २०११मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला होता. ‘‘भविष्यात माझी भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष होण्याची इच्छा आहे. सध्या मी तळागाळातील फुटबॉलला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सिक्किममध्ये तालुकास्तरावर बायच्युंग भूतिया फुटबॉल स्कूल आणि युनायटेड सिक्कीम क्लब यांच्यासह आम्ही काम करत आहोत. मात्र भविष्यात भारतीय फुटबॉलच्या प्रशासनामधील सर्वोच्च पदासाठी मी नक्कीच उत्सुक असेन,’’ असेही भूतियाने सांगितले.

प्रियरंजन दास मुन्शी आजारी पडल्यानंतर २००८पासून प्रफुल पटेल यांनी ‘एआयएफएफ’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. २०१२ आणि २०१६मध्ये ते अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. ४३ वर्षीय भूतिया हा  १००पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा पहिला फुटबॉलपटू ठरला होता. ‘‘सुनील छेत्री हा भारताचा अचाट गुणवत्ता असलेला आघाडीवीर आहे. देशाभारतासाठी तो अनेक गोल लगावत असून त्याची कामगिरी हीच त्याच्या महानतेची साक्ष देते. मधल्या फळीतील खेळाडू म्हणून मला ब्रेंडन फर्नाडेसने प्रभावित केले आहे. एफसी गोवाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातूनही तो खेळत आहे,’’ अशा शब्दांत भूतियाने छेत्री आणि फर्नाडेसचे कौतुक केले.

ईशान्य भारतातील युवा उद्योजकांमुळे या भागातील फुटबॉलमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळत आहे, असेही भूतियाने आवर्जून सांगितले. तो म्हणाला, ‘‘ईशान्येकडील युवा खेळाडूंना फुटबॉलचे साहित्य, शूज आणि अन्य उपकरणे देत युवा उद्योजक मोलाची भूमिका बजावत आहेत. देशातील अन्य भागांत क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे तसा ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉलची लोकप्रियता अफाट आहे. युवा उद्योजक पुढे आल्यामुळे आता या भागातील फुटबॉल हा खेळ नक्कीच पुढे जाईल, यात शंका नाही.’’