उत्कंठापूर्ण लढतीत भारती विद्यापीठ संघाने मुलांच्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी राजस्तान विद्यापीठ (जयपूर) संघावर ७८-६० अशी मात केली.
भारती विद्यापीठ (धनकवडी) येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना विलक्षण रंगतदार झाला. दोनही संघांमधील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात भारती विद्यापीठ संघाने ३५-३० अशी आघाडी मिळविली होती. शेवटपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवीत विजेतेपदावर मोहोर नोंदविली. त्याचे श्रेय अक्षय भोसले व कपील गायकवाड यांच्या वेगवान खेळास द्यावे लागेल. जयपूर संघाच्या शरद दड्डिका व दशरथसिंह यांचे प्रयत्न अपुरे राहिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने तिसरे स्थान मिळविले. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा ७९-७६ असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी ३२-२९ अशी निसटती आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. पुणे संघाच्या राहुलसिंग व नितीन चोपडे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. कोल्हापूरच्या अर्शदखान याची लढत एकाकी ठरली. पारितोषिक वितरण समारंभ भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉ.गुरुदीपसिंग यांच्या हस्ते झाला. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम अध्यक्षस्थानी होते.