नवी दिल्ली : भारताना नामांकित फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाने २ सप्टेंबरला होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी गुरुवारी नव्याने उमेदवारी अर्ज दाखल केला.

४५ वर्षीय भारताचा माजी कर्णधार भुतियाचा अर्ज हा आंध्र फुटबॉल संघटनेने प्रस्तावित केला, तर राजस्थान फुटबॉल संघटनेचे अनुमोदन लाभले आहे. ‘‘भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज भरला असून, हे पद सांभाळण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे. मी देशासाठी आणि नामांकित क्लब्जसाठी अनेक सामने खेळलो आहे. याचप्रमाणे क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक समितीवर असल्याने प्रशासनाचाही अनुभव आहे. भारतीय फुटबॉलला नव्या उंचीवर देण्याची माझी इच्छा आहे,’’ असे भुतियाने सांगितले.

भुतियाने याआधी भरलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जासाठी दीपक मंडलने प्रस्तावित केले होते, तर माजी महिला फुटबॉलपटू मधू कुमारीने अनुमोदन दिले होते. मोहन बागान, ईस्ट बेंगालचे माजी गोलरक्षक आणि पश्चिम बंगालमधील भाजप नेते कल्याण चौबे यांनीसुद्धा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांचे पारडे जड मानले जात आहे.