नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भुतियाने अर्ज केला असला तरी या पदासाठी सध्या आणखी एक माजी फुटबॉलपटू कल्याण चौबे यांचे पारडे जड मानले जात आहे. भुतियाच्या नावाला त्याचा संघसहकारी दीपक मोंडलने प्रस्तावित केले आणि मधू कुमारीने अनुमोदन दिले.

‘‘माजी खेळाडूंना भारतीय फुटबॉलची सेवा करता यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नव्याने खेळाडूंना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मी खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला आहे. खेळाडू म्हणूनच नाही, तर संघटक म्हणूनही खेळाडू चांगले काम करू शकतात, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे,’’ असे भुतिया म्हणाला.

क्रीडा मंत्रालयाची विनंती

 भारतातील श्री गोकुळम केरळ एफसी आणि एटीके मोहन बागान या क्लबच्या संघांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदीनंतरही ‘एएफसी’ स्पर्धेत खेळू द्यावे, अशी विनंती क्रीडा मंत्रालयाने ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) केली आहे.