Bhuvaneshwar Kumar India T20 Comeback Story Fitness Diet RCB: स्विंगचा किंग अशी ओळख मिळवलेल्या भुवनेश्वर कुमारने ४ वर्षांनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्याला टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना गेल्या दोन हंगामांमध्ये भुवनेश्वर कुमारने लक्षवेधी कामगिरी केली. याच बळावर त्याने कमबॅक करत सर्वांना चकित केलं. पण त्याच्या पुनरागमनामागे किती मेहनत आणि फिटनेसवर त्याने कसं काम केलं, जाणून घेऊया.

काही महिने शांततेत निघून गेले होते. भारताच्या २०२२ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर अवघ्या १२ दिवसांनी भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्यात आलं. न्यूझीलंड दौऱ्यानंतर तो भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेपासूनही दूर गेला. मात्र, भुवनेश्वर आणि त्याचा फिजिओ रामनीश वोहरा यांच्यातील नात्यावर या धक्क्याचा परिणाम झाला नाही. २०२२मध्ये भुवनेश्वरने ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या होत्या आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणारा तो भारतीय पुरुष गोलंदाज ठरला होता.

“आम्ही नियमित भेटत होतो, पण जवळपास दोन ते तीन महिने या विषयावर आमच्यात कधीच चर्चा झाली नाही. नेमकं काय चुकलं, याबद्दलही आम्ही बोललो नाही,” असं बीसीसीआयमान्यताप्राप्त फिजिओथेरपिस्ट रामनीश वोहरा यांनी नोएडातील त्यांच्या क्लिनिकमधून द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. भुवनेश्वरची शांतता रामनीश यांच्यासाठीही आश्चर्यकारक होती. अखेर एका सकाळी त्याने मनातल्या भावना व्यक्त केल्या.

“मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचं आहे,” भुवनेश्वरने रामनीश यांना सांगितलं. यावेळी त्याने मोबाइलच्या स्क्रीनकडे बोट दाखवलं. त्या स्क्रीनवर डिसेंबर २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० आणि वनडे पदार्पणाच्या सामन्यांतील त्याच्या गोलंदाजीचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा सुरू होते. नासिर जमशेद आणि मोहम्मद हफीझ यांना आपल्या वेगवान, आतल्या दिशेने वळणाऱ्या चेंडूंनी अडचणीत आणणाऱ्या त्या गोलंदाजीची दृश्यं तो पाहत होता. त्या क्षणांना दहा वर्षे उलटून गेली होती. भुवनेश्वरचा आत्मविश्वास निश्चितच ढासळला होता. त्याला पुन्हा एकदा चेंडू आपल्या मनाप्रमाणे स्विंग करता येईल का? त्याने रामनीश यांना विचारलं, “हे पुन्हा शक्य होईल का?”

मात्र, भारतीय संघाची निळी जर्सी पुन्हा परिधान करण्यासाठी भुवनेश्वर केवळ चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत नव्हता. “त्याला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा होता आणि तो कुठेही खेळत असला, तरी आपली सर्वोत्तम कामगिरी करायची होती. आमच्यातील चर्चा याच विषयावर होती,” अशी आठवण रामनीश यांनी सांगितली. भुवनेश्वरने वैयक्तिक प्रशिक्षक सूर्या यादव यांच्या मदतीने केलेली कठोर मेहनत अखेर मंगळवारी फळाला आली. वयाच्या ३६व्या वर्षी त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात पुन्हा स्थान मिळालं. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२२मध्ये त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमध्येच खेळला होता.

भुवनेश्वरच्या पुनरागमनाचा पाया रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासह आयपीएलमधील सलग दोन यशस्वी हंगामांत रचला गेला. पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकांमध्ये त्याने कमालीचं नियंत्रण दाखवलं. या काळात त्याने ४५ विकेट्स घेतल्या आणि प्रति षटक नऊपेक्षा कमी धावा खर्च केल्या. या कालावधीत आयपीएलमधील सर्व वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली.

रामनीश आणि भुवनेश्वर यांची ओळख कशी?

रामनीश आणि भुवनेश्वर कुमार यांची पहिली भेट २०२०मध्ये कोविड लॉकडाऊनच्या काळात नोएडातील एका अकादमीत झाली होती. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी सूर्या यादव यांनी भुवनेश्वरच्या गोलंदाजीतील तांत्रिक बाबींवर काम करण्यास सुरुवात केली.

“भुवनेश्वरला कधीही गोलंदाजीचा वेग वाढवायचा नव्हता. त्याला फक्त पुन्हा एकदा चेंडू स्विंग करण्याची क्षमता मिळवायची होती. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम त्याच्या स्विंगवर काम केलं. गोलंदाजीतील तांत्रिक बाबी सूर्या सांभाळत होते, तर मी त्याच्या सांध्यांवर काम करत होतो. सर्वप्रथम त्याच्या सांध्यांची हालचाल मोकळी होणं गरजेचं होतं. त्यानंतरच तो ताकद वाढवण्याचे व्यायाम, शरीराच्या हालचालींशी संबंधित सराव आणि पुढे प्रत्यक्ष सामन्यातील परिस्थितीला अनुसरून सराव करू शकत होता,” असं रामनीश यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “२०१२मध्ये गोलंदाजी करताना भुवनेश्वरचा पाय ज्या पद्धतीने क्रिजवर पडायचा, तसंच त्याला पुन्हा करता यावं, याला त्याने प्राधान्य दिलं. त्यावेळी त्याचा पाय जमिनीला टेकताना संपूर्ण मागचा पाय न टेकता पायाच्या बोटांच्या भागावर अधिक भर असायचा.” मे महिन्यात RCBने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये दमदार वाटचाल करत विजेतेपद पटकावलं, तेव्हा भुवनेश्वरच्या खेळातील बदल ठळकपणे दिसून आला. त्याने ताशी जवळपास १४० किलोमीटर वेगाने टाकलेल्या दोन चेंडूंनी शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांना चकित केलं. भुवनेश्वरने आपल्या नव्या जोमात टाकलेल्या बाऊन्सर आणि आतल्या दिशेने वळणाऱ्या चेंडूवर या दोघांना बाद केलं.

“पूर्वी तो इतर अनेक गोलंदाजांप्रमाणेच एक गोलंदाज होता. पण आता त्याची शारीरिक क्षमता इतकी सुधारली आहे की, त्याला वाटलं तर तो मॅरेथॉनही धावू शकतो,” असं रामनीश यांनी अभिमानाने सांगितलं.

भुवनेश्वर कुमारचा डाएटही ठरला गेमचेंजर

रामनीश यांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटव्यतिरिक्त भुवनेश्वरने कधीही मौजमजा किंवा पार्ट्यांना महत्त्व दिलं नाही. “गेल्या सहा वर्षांपासून त्याने साखर, ग्लूटेन आणि लॅक्टोज पूर्णपणे टाळलं आहे. त्याने अंतर्गत अवयवांभोवतीची चरबी कमी केली आहे. हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे,” असं रामनीश यांनी सांगितलं.

पूर्वी भुवनेश्वरचं वजन ८० किलो होतं आणि त्याच्या शरीरातील चरबीचं प्रमाण २२ ते २५ टक्के होतं. आता त्याचं वजन ७५ किलो असून, शरीरातील चरबीचं प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. त्याचबरोबर त्याच्या स्नायूंचं प्रमाणही वाढलं आहे.

या दोघांचं नातं केवळ खेळाडू आणि डॉक्टर इतकंच मर्यादित राहिलेलं नाही. आता ते एकमेकांना भावाप्रमाणे मानतात आणि शहरातील एकाच गृहसंकुलात शेजारी म्हणूनही राहतात. “आम्ही आमच्या कामाचा गाजावाजा सोशल मीडियावर करत नाही. अनेकदा माझ्या घरी किंवा त्याच्या घरी सराव करतो,” असं रामनीश यांनी सांगितलं.

भारतीय संघाची जर्सी पुन्हा परिधान करण्याची संधी भुवीला मिळाली आहे. विशेष म्हणजे, भारतासाठी पुढील वर्षी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या आणखी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.