Bhuvneshwar Kumar Creates History in IPL: आयपीएल इतिहासात भुवनेश्वर कुमारने आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंळुरू यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीने फलंदाजी करताना यंदाच्या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आरसीबीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत २५० धावांचा डोंगर उभारला. तर दुसऱ्या डावात भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत मोठा इतिहास घडवला आहे.
आरसीबीने दिलेल्या २५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं षटक टाकण्यासाठी आला. भुवनेश्वरच्या दुसऱ्याच चेंडूवर मोठ्या धावसंख्येचं लक्ष असल्यामुळे आयुष म्हात्रेने मोठा फटका खेळला. हा मोठा फटका खेळताच तो झेलबाद झाला. यासह मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या भुवनेश्वरने आयपीएल इतिहासातील आपले २०० विकेट्स पूर्ण केले.
भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
भुवी हा आयपीएलच्या इतिहासात स्पर्धेत २०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने ही कामगिरी केलेली नाही. भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून, पहिल्या स्थानी फिरकीपटू युझवेंद्र चहल आहे.
युझवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर २०० विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारने केला आहे. भुवनेश्वर कुमार हा २०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. चहलने या स्पर्धेत आतापर्यंत १७६ सामन्यांमध्ये २२४ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १९२ सामन्यांमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या यादीत सुनील नरेन तिसऱ्या स्थानावर आहे. नरेनने आतापर्यंत १९१ सामन्यांमध्ये १९३ विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावला चौथ्या स्थानावर असून त्याने १९२ सामन्यांमध्ये १९२ विकेट्स घेतल्या आहेत. तर आर अश्विन १८७ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
युझवेंद्र चहल – २२४ विकेट्स
भुवनेश्वर कुमार – २०० विकेट्स
सुनील नरेन – १९३ विकेट्स
पियुष चावला – १९२ विकेट्स
आर अश्विन – १८७ विकेट्स
जसप्रीत बुमराह – १८३ विकेट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या टॉप-५ फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत २५० धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली २८ धावा तर फिल सॉल्ट ४६ धावा करत बाद झाले. यानंतर वादळी फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलने २९ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह अर्धशतकी खेळी केली. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने १९ चेंडूत ६ षटकार व एका चौकारासह ४८ धावांची वादळी खेळी केली. तर टीम डेव्हिडने अखेरच्या षटकांमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं. डेव्हिडने २५ चेंडूत ३ चौकार व ८ षटकारांसह ७० धावांची खेळी करत विक्रमी धावसंख्य उभारली.
