R Ashwin On Bhuvneshwar Kumar: भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला काही वर्ष बाहेर राहिल्यानंतर अखेर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण या मालिकेत त्याला नावाला साजेशी कागमिरी करता आलेली नाही. दरम्यान भारतीय संघाचा माजी गोलंदाज आर अश्विनने भुवनेश्वर कुमारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण तो विकेटस् काढून देण्यात अपयशी ठरला. यासह तो महागडाही ठरला. त्यामुळे अश्विनच्या मते, आता भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची शक्यता खूप कमी आहे. पण त्याने असंही म्हटंलं आहे की, भुवनेश्वर कुमार बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद शमीला स्थान देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

आपल्या युट्यूब चॅनेलवर पत्रकार विमल कुमारसोबत चर्चा करताना आर अश्विन म्हणाला, “जर एखादा युवा खेळाडू असता त्याला आणखी १० किंवा त्याहून अधिक वेळा संधी मिळाली असती. पण भुवी अनुभवी गोलंदाज आहे. त्याने ४ वर्षांनंतर पुनरागमन केलं होतं, त्यामुळे त्याने चांगली कामगिरी कराया हवी होती. भुवनेश्वर कुमारने आपल्या कामगिरीने खूप निराश केलं. त्याने कशी कामगिरी केली हे सोडा, त्याने किती धावा खर्च केल्या ते पाहा. त्याने हे विकेट्स नाही घेतल्या हे पण सोडून द्या, पण आयपीएलमध्ये त्याने ज्या वेगाने गोलंदाजी केली, ती न्यूझीलंड दौऱ्यावर पाहायला मिळाली नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याच्या रनअपची स्पीडही कमी होती. गोलंदाजीची स्पीडही कमी होती. यावरून हेच दिसतं की, तो या मालिकेसाठी सर्वोत्तम ट्रेनिंग फॉर्ममध्ये आलेला नाही. जर अशीच परिस्थिती असेल, तर निवडकर्त्यांनाही विचार करावा लागेल की आपल्याकडे हाच एक पर्याय उरला आहे का?”

तसेच तो पुढे म्हणाला की, “रणजी ट्रॉफी स्पर्धेत मोहम्मद शमी ज्याप्रकारे गोलंदाजी करतोय, तो भुवनेश्वर कुमार पेक्षा चांगल्या रिदममध्ये असल्याचं दिसून येत आहे.” भुवनेश्वर कुमार प्रमाणेच मोहम्मद शमीलाही संघात पुनरागमन करण्याची संधी मिळायला हवी का? असा प्रश्न विचारला असता अश्विन म्हणाला, “हो नक्कीच. पण टीम मॅनेजमेंट आणि मोहम्मद शमी यांच्यात काय चर्चा झालीये मला माहीत नाही. त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. यावर नंतर चर्चा करता येईल.”