आयपीएल २०२६ स्पर्धेतील एका टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. स्पर्धेतील ४२ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ४ गडी राखून बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी अवघ्या १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बचाव करताना भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २८ धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
टी -२० मध्ये पूर्ण केले ३५० विकेट्स
धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला भुवनेश्वर कुमारने दमदार सुरुवात करून दिली. त्याने पावरप्लेमध्ये गुजरातच्या २ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३५० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. भुवनेश्वर कुमार हा ३५० किंवा त्याहून अधिक गडी बाद करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
स्विंग गोलंदाजीचा बादशाह अशी ओळख निर्माण करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला आतापर्यंत ३२५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान ३२४ डावात गोलंदाजी करताना त्याने ३५२ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी ७.३५ इतकी राहिली आहे. या सामन्यात ३ गडी बाद करताच त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. या हंगामातील ९ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने आतापर्यंत १७ गडी बाद केले आहेत.
भुवनेश्वर कुमार गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याची ही दमदार कामगिरी पाहता लवकरच त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड युजवेंद्र चहलच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत ३९१ गडी बाद केले आहेत. आता ३५२ गडी बाद करण्यासह भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी जसप्रीत बुमराह आहे. त्याने आतापर्यंत ३४७ गडी बाद केले आहेत.
