Bhuvneshwar Kumar Record: भारताचा स्विंगचा किंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याच्या दमदार गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याच्या गोलंदाजीत तीच धार पाहायला मिळत आहे. आतपर्यंत त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना भुवनेश्वर कुमारसाठी अतिशय खास आहे. कारण हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
भुवनेश्वर कुमार हा आयपीएल स्पर्धेतील १९ वर्षांच्या इतिहासात २०० सामने खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी बरेच खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा मान पटकावला आहे. पण त्यात फलंदाज आणि यष्टीरक्षकांचा समावेश आहे. भुवनेश्वर कुमार हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे, ज्याने २०० सामने खेळण्याचा पल्ला गाठला आहे. तो २०११ मध्ये आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भुवनेश्वर कुमारसह युझवेंद्र चहल आणि सुनील नरेन यांनी देखील २०० सामने खेळण्याचा मान पटकावला आहे.
भुवनेश्वर कुमारने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्याने या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह सनरायझर्स हैदराबाद आणि पुणे वॉरियर्स इंडिया संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१६ मध्ये त्याने पहिल्यांदा पर्पल कॅपवर कब्जा केला होता. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने पहिल्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता. या हंगामात गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक २३ गडी बाद केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्जा केला होता. या हंगामात गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक २६ गडी बाद केले होते.
यासह भुवनेश्वर कुमारच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये २०० गडी बाद करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला होता. तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत युझवेंद्र चहल आणि सुनील नरेन भुवनेश्वर कुमारच्या पुढे आहेत.
