Bhuvneshwar Kumar spell in UP T20 league 2024 against Kashi Rudras : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या यूपी टी-२० लीगमध्ये खेळत आहे. या लीगचा २५ वा सामना शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी खेळला गेला. लखनऊ फाल्कन्स आणि काशी रुद्राज यांच्यातील या सामन्यात भुवनेश्वर कुमारने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. लखनौ फाल्कन्सकडून खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या घातक गोलंदाजीने काशी रुद्राजच्या फलंदाजांना घाम फोडला. यावेळी त्याने त्याला इकॉनॉमी किंग का म्हणतात? हे दाखवून दिले

लखनौने काशीचा केला पराभव –

भुवनेश्वर कुमारने टी-२० सामन्यात कसोटीप्रमाणे गोलंदाजी केली. त्याने काशी रुद्रारजविरुद्ध ४ षटके टाकली, ज्यात त्याने फक्त ४ धावा दिल्या. त्याच्या २४ चेंडूंपैकी २० डॉट्स होते, तर उर्वरित ४ चेंडूंवर प्रत्येकी एक धाव दिली. भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर लखनौ फाल्कन्स संघाने काशी रुद्रराजला केवळ १११ धावांत गुंडाळले. या सामन्यात भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नसली, तरी त्याच्या गोलंदाजीने काशीच्या फलंदाजांवर दडपण आणले. दबावाखाली त्यांनी इतर गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि विकेट्स गमावल्या.

लखनौ संघाने ११२ धावांचे सोपे लक्ष्य १३.५ षटकांत केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह लखनौचा संघ यूपी टी-२० लीगच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौने ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत. संघाचे केवळ १० गुण नाहीत, तर निव्वळ धावगती देखील खूप चांगली आहे आणि प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार आहे. तर रिंकू सिंगच्या नेतृत्वाखाली मेरठ मावेरिक्स १४ गुणांसह लीगमध्ये अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा – ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?

सर्वाधिक मेडन षटके टाकण्याचा विक्रम –

लखनौचा संघ ५ सप्टेंबर रोजी गोरखपूरविरुद्ध खेळला. भुवनेश्वरने या सामन्यातही उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने ३ षटके टाकली, ज्यात त्याने फक्त ५ धावा दिल्या. टीम इंडियाचा हा अनुभवी गोलंदाज सर्वाधिक मेडन षटके टाकण्यात जगात तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १० षटके मेडन टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने ८७ सामन्यात १७९१ चेंडूत २०७९ धावा दिल्या असून ९० विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Paralympics 2024 : देशाचे रक्षण करताना गमावला पाय, जाणून घ्या कोण आहेत कांस्यपदक जिंकणारे होकाटो सेमा?

दोन वर्षापासून भुवनेश्वर टीम इंडियातून बाहेर –

३४ वर्षीय भुवनेश्वर कुमार जवळपास २ वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याने नेपियरमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. या टी-२० सामन्यात त्याने ४ षटकात ३५ धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. भुवनेश्वरने जानेवारी २०२२ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना आणि जानेवारी २०१८ मध्ये कसोटी खेळला होता. आयपीएलच्या गेल्या तीन मोसमातही तो विशेष काही करू शकलेला नाही.