Bhuvneshwar Kumar Comeback: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजने मालिकेत २-२ ने बरोबरी केली आहे. मालिकेतील पाचवा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
बंगळुरूत होणारा पाचवा टी-२० सामना हा दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असणार आहे. दरम्यान चौथ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करत असताना अर्शदीप सिंगच्या खांद्याला चेंडू लागला. दुखापतीमुळे त्याला फलंदाजी सोडून बाहेर जावं लागलं. त्यामुळे तो पाचव्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्शदीप सिंग जर पाचवा टी-२० सामना खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारला डायरेक्ट एन्ट्री मिळू शकते. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भुवनेश्वर कुमारला देखील पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो बंगळुरूत असून सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. जर अर्शदीप सिंग पाचवा सामना खेळण्यासाठी फिट नसेल, तर भुवनेश्वर कुमारला भारतातच खेळण्याची संधी मिळू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या आव्हानाआधी भुवनेश्वर कुमारचा सरावही होईल. महत्वाच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी गोलंदाज संघात येणं, हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. यासह आणखी एक कारण म्हणजे, आयपीएल स्पर्धेत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याला या मैदानावर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.
जर टीम मॅनेजमेंटने भुवनेश्वर कुमारला खेळवण्याचा निर्णय घेतला, तर हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. कारण ही मालिका सध्या २-२ ने बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजने आजवर भारतात भारतीय संघाविरुद्ध खेळताना एकही टी-२० मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावण्याची रिस्क घेणार नाही. अर्शदीप सिंग गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
