Bhuvneshwar Kumar on India Comeback: स्विंगचा किंग अशी आपली ओळख निर्माण केलेल्या भुवनेश्वर कुमारने यंदाच्या आयपीएल हंगामात कमालीची गोलंदाजी केली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात २१ विकेट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरला आहे. ३६ वर्षीय भुवनेश्वर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यादरम्यान भुवीला टीम इंडियात संधी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण यादरम्यान त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
भुवनेश्वर कुमारने आयपीएल इतिहासात २०१ सामन्यांत ७.६८ च्या इकॉनॉमीने २१९ विकेट्स घेतल्या असून, त्याच्यापुढे फक्त युझवेंद्र चहल आहे. चहलच्या नावावर १८५ आयपीएल सामन्यांत २१९ विकेट्स आहेत. २१ कसोटी, १२१ वनडे आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला अनुभवी भुवनेश्वर कुमार अखेरचा २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताकडून खेळला होता. मात्र आता भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत तो फारसा विचार करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
भुवनेश्वर कुमार टीम इंडियात पुनरागमनाबाबत काय म्हणाला?
“मी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विचार करत नाहीये. अनेक वर्षांपूर्वीच मी दीर्घकालीन ध्येय ठरवणं बंद केलं, कारण जेव्हा जेव्हा मी पुढचा विचार केला आहे, तेव्हा ते माझ्यासाठी यशस्वी ठरलं नाही. २०० सामने, इतक्या विकेट्स, पॉवरप्लेमधील आणि डेथ ओव्हर्समधील कामगिरी हे सगळं मी गेल्या अनेक वर्षांत केलेल्या मेहनतीचं फळ आहे. काही हंगाम खूप चांगले गेले, तर काही कठीणही होते.” असं भुवनेश्वर म्हणाला.
“प्रामाणिकपणे सांगायचं तर, सध्या मला काही विशेष वाटत नाही. अर्थात, भविष्यात या आठवणी खास वाटतील हे नक्की. पण आत्ताच्या क्षणी हे सगळं माझ्यासाठी अगदी सामान्य आहे,” असंही त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडिया व्हिडिओमध्ये सांगितलं.
गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते. त्या मोसमात भुवनेश्वर कुमारने १४ सामन्यांत २८.४१ च्या सरासरीने आणि ९.२९ च्या इकॉनॉमीने १७ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदाच्या शानदार कामगिरीबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला, मला माहिती आहे की २०२६ चा हंगाम माझ्यासाठी चांगला जात आहे. विकेट्स मिळत आहेत, पण मी आधी जे करत होतो, तेच आता देखील करत आहे. अर्थात, सराव थोडा जास्त झाला आहे किंवा काही गोष्टींमध्ये सुधारणा झाली असेल, विशेषतः भारतासाठी खेळत नसल्यामुळे जास्त वेळ मिळाला.
तो पुढे म्हणाला, “आयपीएलनंतर मला बराच मोठा ब्रेक मिळतो, ही माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मी इतकं क्रिकेट खेळतो की खेळाशी संपर्क कायम राहतो आणि त्याचवेळी पुरेसा आरामही मिळतो. त्यामुळे इतर गोष्टी करण्यासाठीही वेळ मिळतो.”
रायपूरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतलेल्या चार विकेट्समुळे भुवनेश्वर कुमारने आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. एका आयपीएल हंगामात सहा वेळा तीन किंवा अधिक विकेट्स घेण्याचा हर्षल पटेलचा विक्रम त्याने गाठला. हर्षलने २०२१ मध्ये ही कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाज म्हणून मूलभूत गोष्टींवर भर देण्याबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला, “मला खात्री आहे की ७०-८० च्या दशकापासून आजपर्यंत क्रिकेटमध्ये मूलभूत गोष्टी बदललेल्या नाहीत. फॉरमॅट बदलला आहे, टी-२०मुळे गोलंदाजांसाठी खेळ थोडा कठीण झाला आहे, कारण या प्रकारात जास्त धावा करण्यावर भर असतो.”
“पण गोलंदाजीची खरी कला अजूनही तशीच आहे. चेंडू स्विंग करणं, योग्य रन-अप आणि गॅदर ठेवणं, ज्याला आपण स्मूथ अॅक्शन म्हणतो, तसेच अतिरिक्त वेग किंवा उसळी निर्माण करणं, या सगळ्या मूलभूत गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत,” असं अखेरीस अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितलं.
