Bhuvneshwar Kumar On Comebac In Team India: भारतीय संघाचा स्टार मध्यमगती वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. २०२२ नंतर तो भारतासाठी एकही सामना खेळू शकलेला नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला आहे ही कामगिरी पाहता,अनेक दिग्गज खेळाडूंनी भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली होती. २०२७ मध्ये भारतीय संघ वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान भुवनेश्वर कुमारने भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वर कुमार म्हणाला, “मी शांत राहतो आणि याचं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देतो. आम्ही घरी असताना कधीच क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी भारतीय संघात पुनरागम करणार की नाही, माझी निवड का झाली नाही किंवा माझं काय चुकलं? याबद्दल आम्ही घरी कधीच चर्चा करत नाही. या गोष्टीने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे आणि मला कसलाही पश्चाताप नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचे प्रमुख सदस्य असता, त्यावेळी प्रत्येकाला हेच वाटतं की, संघ आधी. पण जेव्हा संघाचा भाग नसता, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्हाला हेच वाटतं की, मी तिथे असायला हवं होतं.”
भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०२५ आणि २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या पॉडकास्टमध्ये बोलताना तो पुढे म्हणाला की, “मला हे चांगल्याने समजतं की, बदल हा खेळाचा एक भाग आहे. खेळाडू बदलत राहतात, हेही मला कळतं. असा अनुभव घेणारा मी काही पहिलाच खेळाडू नाही आणि नक्कीच शेवटचाही नसेन. हा खेळाचा एक भाग आहे. यामध्ये कुटुंबाची भूमिका अतिशय महत्वाची असते. मी आज जिथे आहे, तिथे मी खूप आनंदी आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी याआधीही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.त्यामुळे ही अशी गोष्ट नाही, जी आता मला नव्याने साध्य करायची आहे. जर मला आणखी एक संधी मिळाली, तर चांगलंच होईल. पण मी त्या टप्प्यातून आधीच गेलो आहे. मी आता जे काही करतोय, ते फक्त क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी करतोय. मला चांगल्याने माहीत आहे की, मला शिस्तबद्ध राहावं लागेल. मी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, मी यूपी टी-२० लीग स्पर्धा खेळतो. खेळाच्या संपर्कात राहण्यासाठी मी पुरेसे सामने खेळत राहीन. यासह स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी पुरेसा ब्रेकही घेईन, याची मी काळजी घेतो.”
