Hong Kong Sixes 2026 India squad announced Bhuvneshwar Kumar captain: यंदाच्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित झाला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर या स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आगामी हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयपीएल स्टार्सनी सजलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाहूया कसा आहे संघ.

भारताच्या या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, आक्रमक फलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आणि विशेष गोलंदाजीची चांगली सांगड पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या सर्वात वेगवान आणि मनोरंजक फॉरमॅटपैकी एक असलेल्या हाँगकाँग सिक्सेसमध्ये मैदानावर फक्त सहा खेळाडू असतात. त्यामुळे फलंदाजांना किंवा गोलंदाजांना लय पकडण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरतो.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठीच्या भारतीय संघ कोणकोणते खेळाडू?

भारतीय संघात भुवनेश्वर कुमारसह क्रुणाल पंड्या, शशांक सिंह, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि टी. नटराजन यांचा समावेश आहे. शशांक सिंह वगळता या संघातील सर्व खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

भारताने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा केवळ एकदाच जिंकली आहे. रॉबिन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००५ मध्ये भारताने ही कामगिरी केली होती. त्याव्यतिरिक्त, भारत १९९२ आणि १९९६ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हाँगकाँग सिक्सेसचे नियम काय आहेत?

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात आणि प्रत्येक डावात केवळ सहा षटके असतात. यष्टिरक्षक वगळता इतर पाच खेळाडू गोलंदाजी करतात; यात एक खेळाडू दोन षटकं (पण सलग नाही) टाकू शकतो, तर उर्वरित चार खेळाडू प्रत्येकी एक षटक टाकतात. जर एखाद्या फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केलं, तर त्याला ‘रिटायर’ व्हावं लागतं; मात्र, खालच्या क्रमांकाचे फलंदाज बाद झाल्यास किंवा ‘रिटायर’ झाल्यास तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकतो. जर पाच बळी (विकेट्स) पडले, तर शेवटचा उरलेला फलंदाज एकटाच खेळत राहतो.

या स्पर्धेत ‘वाइड’ किंवा ‘नो-बॉल’साठी अतिरिक्त धावा दिल्या जातात, परंतु ‘नो-बॉल’वर ‘फ्री-हिट’ मिळत नाही. हा सामना ४५ मिनिटांत संपतो. २०२४ पासून, सहभागी १२ संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात तीन संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतो आणि अव्वल दोन संघ बाद फेरीत (नॉकआउट राऊंडमध्ये) प्रवेश करतात.

२०२५च्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध DLS पद्धतीने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवत मोहिमेची सुरुवात करणारा टीम इंडिया यंदा हाँगकाँग सिक्सेसमध्ये अधिक पुढे जाण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने भारताचं आव्हान लवकरच संपुष्टात आलं होतं. पाकिस्तान २०२६च्या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरणार आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात पदार्पण करणाऱ्या कुवेतचा पराभव करत पाकिस्तानने विक्रमी सहाव्यांदा हॉंगकॉंग सिक्सेसचं विजेतेपद पटकावलं होतं.