BCCI Central Contract List: बीसीसीआयकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्रेड ए प्लस श्रेणीत असणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्माचं डिमोशन झालं आहे. बीसीसीआयकडून या दोन्ही दिग्गजांचा ग्रेड बी कॅटेगरीत समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघे केवळ वनडे क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ग्रेड ए प्लस कॅटेगरीतून बाहेर करण्यासह बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ग्रेड ए प्लस कॅटेगरी काढून टाकली आहे.आतापर्यंत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची सुरूवात ग्रेड ए प्लस कॅटेगरीपासून होत होती. पण बीसीसीआयने ही कॅटेगरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रेड ए प्लस कॅटेगरीत त्याच खेळाडूंचा समावेश केला जायचा, जे खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतात. पण सध्या असा एकही खेळाडू नाही, जो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे ही कॅटेगरीच रद्द करण्यात आली आहे. तर ग्रेड ए कॅटेगरीत वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे.

तर आतापर्यंत ग्रेड ए प्लस कॅटेगरीत असणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्माचा ग्रेड बी कॅटेगरीत समावेश करण्यात आला आहे.या कॅटेगरीत विराट आणि रोहितसह आणखी ११ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. ज्यात केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ग्रेड सी कॅटेगरीत युवा फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनूसार ग्रेड ए प्लस कॅटेगरीत असणाऱ्या खेळाडूंना ७ कोटी, ग्रेड ए मध्ये असणाऱ्या खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड बी मध्ये असणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी आणि ग्रेड सी मध्ये असणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रूपये दिले जात होते. पण आता ग्रेड ए प्लस कॅटेगरी हद्दपार करण्यात आली आहे. तरीदेखील खेळाडूंचं मानधन कमी केलं जाणार नाही. कुठलाही खेळाडू ग्रेड ए प्लस कॅटेगरीत नसल्यामुळे एकाही खेळाडूला ७ कोटी रूपये दिले जाणार नाहीत. मुख्य बाब म्हणजे, टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळवणाऱ्या इशान किशनचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

ए कॅटेगरी- शुबमन गिल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह
बी कॅटेगरी- रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर.

सी कॅटेगरी- शिवम दुबे, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, ऋतुराज गायकवाड.