काही दिवसांपूर्वीच अजित आगरकर यांचा मुख्य निवडकर्तेपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले आहेत. निवड समितीचा भाग असलेल्या प्रज्ञान ओझाची कार्यवाहक मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची निवड प्रज्ञान ओझाच्या नेतृत्वाखालील निवड समितीने केली आहे. या मीटिंगला भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण देखील उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की, संघ निवडताना व्हीव्हीएस लक्ष्मणची भूमिका काय होती? दरम्यान बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मिळाली नवी जबाबदारी

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठी घोषणा केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण इथून पुढे निवड समितीच्या प्रत्येक मीटिंगला हजेरी लावणार आहेत. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सिलेंसच्या प्रमुखाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली होती. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी झालेल्या संघ निवडीसाठीही व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. देवजीत सैकिया यांनी यामागचं कारणही सांगितलं आहे. सेंटर ऑफ एक्सिलेंस आणि निवडकर्ते यांच्यातील ताळमेळ आणखी पारदर्शक व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

देवजीत सैकिया यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “व्हीव्हीएस लक्ष्मण इथून पुढे होणाऱ्या निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत भाग घेणार आहेत. सेंटर ऑफ एक्सिलेंस आणि निवडकर्ते यांच्यातील ताळमेळमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा परिणाम टीम कॉम्बिनेशनवर होतोय. जर व्हीव्हीएस लक्ष्मण मीटिंगमध्ये असतील, तर खेळाडूंच्या फिटनेसबाबत आणि पुनरागमनाबाबत माहिती देणं सोपं होईल.” बीसीसीआयच्या आढावा बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देवजीत सैकिया यांनी दिली.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला गेला होता की, निवड समिती आणि सेंटर ऑफ एक्सिलेंस यांच्यात हवा तसा संवाद होत नव्हता. त्यामुळे कुठला खेळाडू दुखापतग्रस्त आहे, कुठला खेळाडू दुखापतीतून सावरतोय या सर्व गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या. यासह भारतीय अ संघाच्या निवडीवरून वाद झाले. ४ ऑक्टोबरला अजित आगरकरांचा मुख्य निवडकर्तेपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता व्हीव्हीएस लक्ष्मण देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पण संघ निवडण्यात त्यांची कुठलीही भूमिका नसेल.